Categories: कृषी

घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या साखरेचे विक्री दर वेगवेगळे असावेत – नाईकनवरे

नवी दिल्ली। साखरेच्या किमान विक्री दरात (मिनिमम सेलिंग  प्राईस ) वाढ करण्यात यावी व घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या साखरेचे विक्री दर वेगवेगळे असावेत अशी सूचना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केली आहे. 

साखरेच्या वापरावर जागतिक स्तरावर घट होत असून ती दोन टक्क्यावरून थेट अर्ध्या टक्क्यावर आली आहे याकडे लक्ष्य वेधून  राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की जरी जगातील लोकसंख्या वाढत आहे तरी साखरेचा खाण्यासाठी होणारा वापर मात्र कमी होत आहे. यामागे जागतिक साखर विरोधी मोहीम कार्यरत आहे. या शिवाय जगातील तीस देशांनी साखर मिश्रित उत्पादनांवर वेगवेगळे कर ही आकारले आहेत. एकीकडे ट्रिम, स्लिम & जिम याकडे तरुण आकर्षित होत आहेत तर दुसरीकडे मिठाई, चॉकलेट्स, बिस्किटे, शीतपेये यातील साखरेचा वापर कमी होत चालला आहे. परिणामस्वरूप बाजारातील साखरेची मागणीही कमी होत  आहे. आणि याचा फटका साखर उद्योगाला बसत असल्याचे नाईकनवरे यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धसदृश्य वातावरण असल्याने त्याचे परिणाम क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावर व किमतीवर आणि त्याचा प्रतिकूल परिणाम भारतातील व भारताबाहेरील इथेनॉलच्या प्रकल्पांवर होण्याची भीती आहे . कारखाना परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर इथेनॉल मिश्रणाची परवानगी दिल्यास वाहतुकीवरील खर्चात बचत होऊ शकेल. देशातील १९ राज्यांतील पाच कोटी शेतकरी ५१ लाख हेक्टर क्षेत्रात ऊसाचे पीक घेतात व त्यातून वर्षागणिक चार हजार लाख टन उसाचे उत्पादन होते. परंतु बदलत्या हवामानात , कमी पाण्यात, कमी दिवसात व ज्यास्त उत्पादन करणारे ऊसाचे वाण अजून तयार झाले नाही. शिवाय खोडवा व्यवस्थापन हे क्षेत्र सातत्याने दुर्लक्षित राहिले आहे. आणि ऊसाच्या दोन पट्ट्यात मिश्र पीक घेण्याच्या तंत्रातही आपण मागे आहोत अशी आव्हाने साखर उद्योगसमोर उभी ठाकली आहेत, असेही नाईकनवरे यांनी सांगितले आहे.

संपूर्ण देशात उसाची किंमत सामान असावी. साखर उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी वाफे मध्ये तीस टक्के बचत, ऊर्जेत २५ किलो वॅटची बचत करण्यासाठी कारखान्यातील यंत्र सामुग्री अद्ययावत असावी,  साखर कारखान्यांनी जागतिक दर्जाच्या साखरेचे उत्पादन करावे. साखरेचे धोरण ठरविण्याऱ्यांनी(पॉलिसी मेकर्स)  एस, एम व एल ग्रेड साखरेच्या किमान विक्री किमतीतील भिन्नता राखावी. त्याच प्रमाणे  साखरेची सध्याची किमान विक्री किंमत ठरविताना वित्त आणि घसारा किंमतही लक्षात घ्यावी. सध्या कर आणि  साखरेच्या एक्स मिल किमतीत व घाऊक किमतीत किलो मागे सात रुपयाचा फरक आहे. याही बाबी ध्यानात घ्याव्या असे नाईकनवरे यांनी स्पष्‍ट केले आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: sugar industry प्रकाश नाईकनवरे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ साखर उद्योग