Categories: Featured

ऐन गळीत हंगामाच्या तोंडावर राज्यातील ऊसतोड कामगार जाणार संपावर..!

कोल्हापूर | ऐन गळीत हंगामाच्या तोंडावर विविध मागण्यांसाठी ऊसतोड कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून संपावर जाण्याची तयारी केलीय. राज्यातील ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या दरात वाढ करावी, सरकारने जाहीर केलेल्या ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाचे कामकाज सुरू करावे, कोरोनापासून सुरक्षिततेच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या,त्याशिवाय हातात कोयता धरणार नसल्याचा पवित्रा महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेने घेतला आहे. याबाबत सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

डॉ.जाधव म्हणाले, गेल्या वेळी तोडणी वाहतूक दरवाढीच्या तीन वर्षाचा करार पाच वर्षांचा केल्यामुळे या कामगारांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले. आता कराराची मुदत संपल्यामुळे संघटनेने नवीन करार करण्यासंबंधीच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री यांना दिले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी देखील याबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र केवळ आश्वासनापलिकडे ऊसतोड कामगारांच्या हातात काहीच पडलेले नाही. 

या पार्श्‍वभूमीवर, राज्य साखर संघाने साखर भवन मुंबई येथे सर्व कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली होती. त्यामध्ये नवीन करार तीन वर्षाचा करण्यासंबंधी राज्य साखर संघाचे पदाधिकारी आणि संघटनेच्या प्रतिनिधी यांच्यात सहमती झाली होती. यंदाचा हंगाम २०२०-२१ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी सर्व मागण्या संबंधीचा नवीन सामंजस्य करार झाला नाही, तर दिनांक १ ऑक्टोबर पासून संप सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे.

या काळात ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार, मुक्कादम गाव सोडणार नसल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत २१ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. 

Team Lokshahi News