बीड | मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश मिळणार नाही या चिंतेतून एका अठरा वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विवेक राहाडे (रा. केतूरा) असे या तरूणाचे नाव आहे. त्याने नुकतीच नीट (NEET) परिक्षा दिली आहे. परंतु मराठा आरक्षण गेल्यामुळे नीटमध्ये नंबर लागला नसल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने सुसाईट नोट मध्ये लिहिले आहे.
विवेकने आपल्या सुसाईड नोटमध्ये, “मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी नुकतीच नीट (NEET) ही मेडिकलची परीक्षा दिली आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा नीटमध्ये नंबर लागला नाही. प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकवण्याची माझ्या घरच्यांची ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि माझे मरण सार्थक होईल.” असे लिहिले आहे.
दरम्यान केतुरा गावात राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक येत आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही केतुरा येथे येऊन विवेकच्या कुटुंबाचे सांत्वन केले. मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने त्याच्या कुटूंबियांवर मोठा आघात झाला आहे. सरकार असे आणखी किती विवेक बळी देणार आहे? असा संतप्त सवाल विवेकच्या कुटुंबियांनी विचारला आहे. घटनेचे गांभिर्य ध्यानात घेता, या प्रकरणानंतर केतूरा गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.