Categories: Featured राजकीय

सुनील केदारांचा शहाजोगपणा की आगाऊपणा?

Sopan Pandharipande(लेखक लोकमत समूहाचे माजी वाणिज्य संपादक आहेत )

महाराष्ट्रातील काँग्रेसचे दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी धमकी दिली आहे. या तिघांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसचा नवा अध्यक्ष गांधी घराण्याच्या बाहेरील असावा अशी सूचना केली आहे. या सुचनेला सुनील केदार यांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक व मिलिंद देवरा यांनी पक्ष नेतृत्वाची माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही अशी धमकी दिली आहे.
केदारांचे स्वतःचे काहीच कर्तुत्व नसल्याने, काँग्रेस नेतृत्वाची हुजरेगिरी करून मंत्री पद पदरात पाडण्यात त्यांची पूर्ण राजकीय कारकीर्द आजवर गेलेली आहे. विशेष म्हणजे आज पक्षनिष्ठेच्या गप्पा मारणारे सुनील केदार यांनी 1995 साली काँग्रेसच्या विरोधात बंडखोरी करून सावनेरमधून निवडून येण्याचा पराक्रमही केलेला आहे. असो.

गुंड प्रवृत्तीच्या केदारांकडून धमकी शिवाय दुसरी अपेक्षा तरी काय करावी?
मुळात प्रश्न असा आहे की सुनील केदार यांना हे सर्व बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? याचे कारण आपल्या नाकर्तेपणामुळे सुनील केदार यांनी अध्यक्ष असताना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 150 कोटी रुपयांचे नुकसान रोखे घोटाळ्यात करून ठेवले आहे. त्या प्रचंड मोठया घोटाळ्यातून ती बँक सावरलेली नाही व आजही दिवाळखोरीचया उंबरठ्यावर आहे. सहकार खात्यासकट इतर तीन अंकेक्षकांनी या घोटाळयाबद्दल सुनील केदार यांना दोषी ठरवून त्यांच्याकडून 150 कोटी रुपये 2002 पासून 12 टक्के व्याजाने वसूल करावेत असे आदेश दिले आहेत. हा खटला नागपूरच्या न्यायदंडाधिकारी कोर्टात आजही सुरू आहे. त्यामध्ये सुनील केदार यांना सात वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते यापूर्वी 2002 साली सव्वातीन महिने सुनील केदार जेल मध्ये राहून आलेले आहेत आणि सध्या जमानतीवर जेलबाहेर आहेत. जनप्रतिनिधी कायद्याच्या एका पळवाटेमुळे गेल्या चार निवडणुकांमध्ये सुनील केदार सावनेर मतदारसंघातून निवडून येत आहेत आणि तरीही त्यांची मुजोरी कमी झालेली नाही. कारण गेली अठरा वर्षे आपल्या विरुद्ध चा खटला त्यांनी येनकेनप्रकारे प्रलंबित ठेवला आहे आणि यातच ते धन्यता मानतात.

एवढा ‘दैदिप्यमान’ इतिहास असतानाही सुनील केदार शहाजोगपणा दाखवत आहेत. स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप असताना आणि खटला कोर्टात चालू असताना आणि तोही येनकेनप्रकारे 18 वर्षे प्रलंबित ठेवण्याचा पराक्रम केलेल्या सुनील केदार यांना काँग्रेस नेतृत्वाला सल्ले देण्याचा नैतिक अधिकाराच पोहोचत नाही. हा खरं म्हटलं तर त्यांचा आगाऊपणा आहे.
हे करण्यापूर्वी सुनील केदार यांनी कमीत कमी आपली पात्रता तरी ओळखायची. काँग्रेस पक्षांमध्ये वडिलांच्या पुण्याईवर जगणारे सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखे ऐतखाऊ नेते आहेत तसेच सुनील केदार आहेत. फरक एवढाच की केदारांना जेलचा अनुभव आहे, तो इतर दोघांना नाही.
केदारांचे स्वतःचे असे काय काम आहे? पूर्ण राजकीय जीवनामध्ये सुनील केदारांनी महाराष्ट्रातली सगळ्यात जुनी नागपूर जिल्हा सहकारी बँक बुडवणयाशिवाय दुसरं काय काम केलं आहे? आणि आता ते काँग्रेस नेतृत्वाला सल्ला द्यायला निघाले आहेत. मुळात या अशा आगाऊ लोकांमुळेच काँग्रेस पक्षाची दुर्दशा झाली आहे. त्यासाठी केदार यांची पक्षातून हकालपट्टी होणे आवश्यक आहे.

खरंतर काँग्रेस हा भारतासाठी आदर्श असा राजकीय पक्ष आहे पण त्या पक्षाने दुसऱ्या फळीचे नेतृत्व कधीच तयार केले नाही. भाई-भतिजा वादाच्या पुढे काँग्रेस कधी सरकलीच नाही. जयांना बुद्धिवंत म्हणता येईल असे चिदंबरम सुद्धा त्यांचे पुत्र कार्ती याचा पुत्रमोह टाळू शकले नाहीत. शेवटी व्हायचे तेच झाले, आज काँग्रेसमध्ये देश पातळीवरचे नेतृत्वच शिल्लक नाही. अध्यक्षपदासाठी जी तीन-चार नावे घेतली जात आहेत त्यात कपिल सिब्बल. आनंद शर्मा. गुलाम नबी आझाद.पृथ्वीराज चव्हाण इत्यादी लोकांचा समावेश आहे. पण यापैकी कोणत्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी जनतेमध्ये जाऊन काम केले आहे असे विचारलले तर एकानेही नाही असे उत्तर येते.

त्यामुळे आता जीर्ण झालेल्या काँग्रेस पक्षाला भवितव्यच नाहीये. शिवाय एकच अध्यक्ष किती दिवस मिरवणार आणि गांधी आडनावाचा किती दिवस फायदा घेणार? हेही आता थांबायला हवे. आता काँग्रेसवाल्यांनी नवीन नेतृत्व शोधायला हवे. ते जर मिळत नसेल तर ”सरळ पक्ष बरखास्त करावा. कुणीतरी निस्वार्थी माणूस पुढे येईल व त्याच आदर्शांसह नव्या नावाने पक्ष पुनरुज्जीवित करेल. नाहीतरी काँग्रेस या नावाची आता शिसारी यायला लागलेली आहे.”

Team Lokshahi News