पुणे। सध्या सुरू असलेल्यालॉकडाऊनमुळे पुणे व नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणच्या बाजार समित्या बंद आहेत. त्यामुळे कांदा उत्पादकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून उत्पादित झालेला कांदा विकायचा कसा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही व्यथा तरुण शेतकरी भागवत दाभाडे पाटील यांनी ट्विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडली. या ट्विटची तातडीने दखल घेत सुप्रिया सुळे यांनी कांद्यासाठी बाजार समित्या सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केल्याचे सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यातील पुणे, चाकण, मंचर, जुन्नर, आळेफाटा, ओतूर, शिरूर येथील कांदा बाजार चालू- बंद होत आहे. नगरमधील घोडेगाव व राहुरी येथील कांदा बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याची तक्रार शेतकरी भागवत दाभाडे पाटील यांनी ट्विटरद्वारे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती. त्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेतली असून, कांद्यासाठी बाजार समित्या सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे म्हटले आहे.
सध्या कांद्याबरोबर कापसाचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ट्विटरव्दारे यासंदर्भात पाठपुरावा करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली आहे.