Categories: बातम्या सामाजिक

कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यालाच बंधाऱ्याला डांबले; संतप्त आंदोलकांचे कृत्य

कोल्हापूर | पंचगंगा नदी प्रदुषण प्रकरणी पाहणी करण्यासाठी गेलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला डांबून ठेवण्याचा प्रकार घडला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण मंडळाच्या सचिन हरबट या अधिकाऱ्यास तेरवाड बंधाऱ्याच्या कठड्यालाच दीड तास बांधून ठेवले. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापटही झाली. संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना पंचगंगा नदीच्या प्रदूषण प्रकरणी धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार केला. तसेच प्रदूषणास जबाबदार घटकांवर कारवाईचा आग्रह धरला. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य आोळखून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिंगारे यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी अधिकाऱ्यास सोडले. 

पंचगंगा नदीत रसायनयुक्त पाणी मिसळत असल्याने दुषित पाण्यामुळे तेरवाड बंधार्‍यावर मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडले आहेत. या मृत माशांचा खच पडला असून दुर्गंधी पसरली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीत तेरवाड बंधाऱ्यापर्यंत कोल्हापूर महानगरपालिका औद्योगिक वसाहत प्रोसेस व छोट्या-मोठ्या गावांचे सांडपाणी प्रक्रियेविना सोडले जाते. यामुळे पाण्याला काळा रंग आला आहे. मासे मृत्युमुखी पडले आहेत. रासायनिक पाणी शेती उपयोगी नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालीघाटे, बंडू पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार आज दुपारी तीनच्या सुमारास प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी हरबट तेरवाड बंधार्‍यावर पाहणीसाठी आले होते. बंडू पाटील, विश्वास बालिघाटे यांच्यासह आंदोलकांनी हरबट यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत त्यांना बंधाऱ्याच्या कठड्याला दोरीने बांधून ठेवले. 

दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आशोक शिंगारे यांनी पंचगंगा प्रदूषणाला इचलकरंजी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार ठरवून पालिकेने मृत्यूमुखी पडलेले मासे नदीतून उचलून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावावी. तसेच टाकवडे-इचलकरंजी रस्त्यावर असणाऱ्या काळ्या नदीच्या ओढ्यावर तीन दिवसात तीन बांध घालून कलोरिन डोस सुरू करून प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या, तर क्षेत्रीय अधिकारी हरभट यांनी पाण्याचे नमुने घेऊन तेरवाड बंधाऱ्यावरील मृत माशांचा पंचनामा केला. नमुने तपासणीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून अहवाल आल्यानंतर लवकरच कारवाई करू असे आश्वासन दिले.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला पंचगंगा नदीप्रदुषणाचे गांभीर्य नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम प्रशासनाकडून केले जाते. प्रदुषण करणार्‍या घटकांना पाठिशी घालण्याचे काम हेच प्रशासकीय अधिकारी करतात. त्यामुळे आज घडलेल्या प्रकारामुळे शहाणपण आले असेल तर यापुढे तरी कडक कारवाई करा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी युवा आघाडीचे नेते बंडू पाटील व विश्वास बालिघाटे यांनी दिला. यावेळी राघू नाईक, योगेश जिवाजे, बंडू उमडाळे, बाहुबली चौगुले, प्रमोद चौगुले आदी उपस्थित होते.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: polution control board kolhapur