Categories: गुन्हे

हुपरी येथे लाच घेताना तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

कोल्हापूर | हुपरी येथे विंधन विहिरीची सातबाऱ्यावर नोंद घेण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने यास लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले. तक्रारदार यांनी मे २०२० मध्ये हुपरी गावातील त्याच्या गटक्रमांक १८७६ मधील शेतामध्ये बोरवेल मारली आहे. याची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी आरोपीने लाचेची मागणी केली होती.  

तक्रारदाराने आरोपी तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने (व.व. 54, रा. प्लॉट क्र. 54 संभाजीपूर अण्णासाहेब चकोते शाळेसमोर) याच्याकडे १६ जून रोजी अर्ज दिला होता. तेव्हा तक्रारदार कोतवाल मुदाळे यांना भेटले असता तलाठी शेरखाने बोरवेलची नोंद घेण्यासाठी ३ हजार रुपये मागत आहेत. पैसे दिल्याशिवाय ते तुमच्या बोरवेलची नोंद सातबाऱ्यावर करणार नाहीत तेव्हा तुम्ही त्यांना

जाऊन भेटा असे सांगितले. त्याबाबत तक्रारदारने तलाठी शेरखाने विरुध्द तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार आज हुपरी तलाठी कार्यालयामध्ये शासकीय पंच साक्षीदाराच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता पडताळणीमध्ये शेरखाने याने तडजोडीअंती २ हजार रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज लावलेल्या सापळ्यात २ हजार रक्कम स्वीकारताना तलाठी शेरखाने रंगेहात सापडला.

याप्रकरणी, हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, हवालदार मनोज खोत, जवान शदर पोरे, नवनाथ कदम, सुनील घोसाळकर यांच्या पथकाने केली. 

लाचेच्या अथवा अपसंपदेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी लाच- लुचपत प्रतिबंधक विभाग टोल फ्री क्रमांक 1064, 0231-2540989, व्हॉटस् ॲप क्रमांक- 7875333333, 9011228333 यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधिक्षक बुधवंत यांनी केले आहे.

Team Lokshahi News