Categories: Featured गुन्हे

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या छिंदमला ठाकरे सरकारचा मोठा दणका

अहमदनगर। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपचा माजी उपमहापौर आणि अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने जोरदार दणका दिलाय. नगरविकास विभागाने श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द केले आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी त्याच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. 

श्रीपाद छिंदमने अहमदनगरच्या उपमहापौर पदावर असताना फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते. छिंदमच्या विरोधात अहमदनगरमध्ये जोरदार आंदोलनेही करण्यात आले होती. त्यानंतर श्रीपाद छिंदमकडून उपमहापौर पदाचा राजीनामा घेत भाजपमधून त्याची हकालपट्टी करण्यात आली होती. 

महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमचे नगरसेवक पद देखील रद्द करण्यात आले होते. मात्र २०१८ ची अहमदनगर महापालिका निवडणूक छिंदमने अपक्ष लढवली होती. या निवडणुकीत छिंदम प्रभाग ९ (क) मधून निवडून आला होता. 

महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी छिंदमवर कारवाई करण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवर गुरुवारी सुनावणी होणार होती. या सुनावणीला छिंदमला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र छिंदम या सुनावणीला उपस्थित राहिला नाही. त्यानंतर आजच्या सुनावणीलाही छिंदम अनुपस्थित होता. अखेर आज छिंदमला मुदतवाढ न देता किंवा त्यांची वाट न पाहता नगरविकास विभागाने आपला निकाल सुनावला. 

महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. महापुरुषांच्या नावाने राज्याच्या प्रशासनाचे काम चालते. असं असतानाच लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांबद्दल अशाप्रकाराची वक्तव्य केली जात असतील तर त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो असं निकालादरम्यान नगरविकास विभागाने स्पष्ट करत छिंदमचे नगरसेवक पद काढून घेण्याचा निर्णय दिला आहे.

Team Lokshahi News