कांदा निर्यात बंदीवरून ठाकरे सरकारचा मोदी सरकारविरूध्द आक्रमक पवित्रा..!

मुंबई | नुकताच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर राज्य सरकार देखील आक्रमक झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने केंद्राच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी  केंद्राला पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या देशात लॉकडाऊनची परिस्थती आहे, यामुळे गेले ६ महिने शेतकऱ्यांनी आतोनात नुकसान सहन केलं आहे. या महामारीच्या काऴात देखील हार न मानता शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने कांद्याचे उत्पादन घेतले आहे. हाती कांद्याचे उत्पादन आले असताना हा कांदा देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशात देखील विकण्याची चांगली संधी होती. परंतु केंद्र सरकारने सोमवारी दुपारी अचानक कांद्यावर निर्यातबंदी जाहीर केली. यामुळे हजारो टन कांदा आता बंदरांमध्ये अडकून पडला आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी  केंद्राला पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयाने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव पाडले बंद – 
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दरात क्विंटल मागे १००० रुपयांची घसरण झाली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडलेत. मनमाडमध्ये शिवसेनेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे. लासलगावला शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य शिवा सुरसे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कांदा निर्यात बंदीच्या या निर्णयामुळे लासलगाव बाजार समितीत मोठा परिणाम दिसून आला.

कांदा निर्यात बंदी आणि बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशारा – 
मागील काही वर्षांपासून कांदा उत्पादक सातत्याने अडचणीत सापडलेला आहे. नुकत्याच हाती आलेल्या पिकामुळे आता कुठे कांद्याला भाव मिळायला लागले होते. यात अचानक केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद करण्याचा आदेश काढला. त्यामुळे निर्यातीसाठी निघालेले कांद्याचे कंटेनरच बंदरात अडकले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यमंत्री बच्चू कडू आक्रमक झाले असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य व कृषी मंत्रालयात छुप्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, कांद्या प्रश्नी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे खासदारही उपस्थित राहणार आहेत. संसद भवनातील पीयूष गोयल यांच्या कार्यालयात ही बैठक  होणार आहे.