गगनबावडाः ‘त्या’ २ महिन्याच्या बाळालाही कोरोनाची लागण!

  2027

  गगनबावडा। तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असून दोन महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी अणदूर येथील ३४ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या महिलेची दोन महिन्यांपूर्वी प्रसुती झाली होती. आता तिच्या बाळालाही कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे.

  ही महिला तिच्या पतीसोबत काही दिवसांपूर्वी मुंबईवरून कोल्हापूरात आली होती. कोल्हापूरात आल्यानंतर त्यांनी सीपीआर मध्ये स्वॅब दिले होते. त्यानंतर ३ दिवस सीपीआर मध्ये राहून त्यांना अणदूर येथील शाळेत क्वारंटाईऩ करण्यात आले होते.

  दरम्यान बुधवार (२० मे) रोजी या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. सध्या या महिलेवर आणि बाळावर सीपीआरच्या कोरोना कक्षात उपचार सुरु असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे गगनबावड्याचे तहसिलदार संगमेश कोडे यांनी सांगितलय. 

  सध्या गगनबावडा तालुक्यातील कोरोनाग्रस्ताची संख्या ५ झाली असून यापैकी ३ जणांवर गगनबावडा येथे उपचार सुरू आहेत. तर कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांनाही गगनबावडा येथील कोरोनासेंटर येथे क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावरही आरोग्य यंत्रणेची नजर आहे. 

  • सध्या कोल्हापूरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात कोरोनाचे आणखी ३२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २६० वर गेला आहे.