नवी दिल्ली | अग्निपथ योजनेवरून (agneepath protest) देशातील बहुतांश भागात संघर्ष उफाळून आला आहे. त्यामुळे ही योजना किती फायदेशीर आहे हे सांगण्यासाठी देशभरातील भाजपेयी घसा कोरडा करत आहेत. इंदूरमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनीही एक पाऊल पुढे जाऊन एक वक्तव्य केले असून, त्यावरून आता नवीन वाद सुरू झाला आहे. भाजप कार्यालयात सिक्योरिटी नेमायचे झाल्यास अग्निवीरांना प्राधान्य देऊ, असे कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

कैलास विजयवर्गीय यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेससह देशातील अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून देशातील तरुण आणि लष्कराच्या जवानांचा इतका अनादर करू नका, असे म्हटले आहे. आपल्या देशातील तरुण रात्रंदिवस परिश्रम करून शारीरिक परीक्षा उत्तीर्ण होतात. कारण, त्यांना सैन्यात भरती होऊन आयुष्यभर देशसेवा करायची आहे, भाजप कार्यालयाबाहेर पहारेकरी व्हायचे म्हणून नाही.

भाजप कार्यालयात सुरक्षा ठेवली तर येथेही अग्निवीरांना प्राधान्य देऊ
बिहार आणि यूपीनंतर आता मध्य प्रदेशातही अग्निपथ योजनेवरून तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. इंदूरमध्ये विद्यार्थी गेले दोन दिवस निदर्शने करत आहेत. आज कैलाश विजयवर्गीय मीडियाशी संवाद साधण्यासाठी इंदूरमधील भाजप कार्यालयात पोहोचले. याबाबत कैलाश विजयवर्गीय यांना विचारले असता त्यांनी सर्वप्रथम अग्निपथ योजनेचे फायदे सांगितले. त्यानंतर अग्नीवीर म्हणून काम केल्यानंतर बाहेर पडल्यावर १३ लाख रुपये मिळतील, असे सांगितले. तसेच त्याच्यावर अग्निवीरचा शिक्काही लागलेला असेल. भाजप कार्यालयात सुरक्षा ठेवली तर येथेही अग्निवीरांना प्राधान्य देऊ, असे कैलाश विजयवर्गीय पुढे म्हणाले. 

विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सडकून टीका 

अग्निपथबाबतच्या सर्व शंका भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यावरून दूर झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हा सत्याग्रह याच मानसिकतेविरुद्ध असल्याचे काँग्रेसने म्हणटले आहे.

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्वीट केले आहे की, भारतीय तरुणांनी अग्निपथ योजनेबद्दल घाबरू नये. 4 वर्षांनंतर त्यांना भाजप कार्यालयाचा चौकीदार बनवण्यात येणार आहे. तर समाजवादी पार्टी मीडिया सेलने ट्विट केले आहे की हे भाजप नेते कैलाश विजयवर्गीय म्हणतात की हे साहेब अग्निवीरांना भाजप कार्यालयात चौकीदार / शिपायाची नोकरी देतील. देशाच्या सेवेच्या भावनेने देशातील तरुणांचे हेच भविष्य असेल का? देशातील तरुण/सैनिकांना काही उद्योगपती/भाजपच्या दारात नोकऱ्या देणार का? असा सवालही यानिमित्ताने सपा ने उपस्थित केलाय.

विशेष म्हणजे कैलाश विजयवर्गीय हे पश्चिम बंगाल भाजपचे प्रभारी आहेत. वादग्रस्त विधानांमुळे ते कायम चर्चेत असतात. अग्निवीरांच्या मुद्द्यावर वक्तव्य करून त्यांनी स्वतच्या पक्षाला अडचणीत आणले आहे. कैलास यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी मात्र मौन बाळगल्याचे सध्यातरी दिसत आहे.