मुंबई | शिवसेनेचे नाराज मंत्री व ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करण्यासाठी शिवसेनेच्या गोठातून काही निकटवर्तीय गुजरातला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काही शिवसेनेच्या आमदारांचा समावेश असून हे आमदार एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय मानले जातात. हे सर्व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा निरोप घेऊन गुजरातला रवाना झाल्याचे समजते.

एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संभाषण घडवून आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहेत. या सर्व घडामोडीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये खळबळ माजली आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आपआपल्या आमदारांसोबत बैठका सुरू झाल्या आहेत. तर विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहचल्याने चर्चाना आणखी उधान आलय.

विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या नॉट रिचेबल असून बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २२ आमदार आहे. गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये हे सर्व आमदार असून या आमदारांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं आहे. दुपारी २ च्या दरम्याम एकनाथ शिंदे सुरत मधून पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी पत्रकार परिषदेत शिंदे काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.