Categories: ब्लॉग

खाकी आणि मैत्री या दोन्ही पातळीवर सर्वात जवळचा वाटणारा पहिला पोलीस अधिकारी…

“खाकी आणि मैत्री” या दोन्ही पातळीवर सर्वात जवळचे वाटणारे पहिले पोलीस अधिकारी म्हणून मी डॉ. अभिनव देशमुख सर यांच्याकडे पाहतो….सर्वच ठिकाणी पोलीस आणि पत्रकार यांच्यातली मैत्री ही हातचे राखूनच असते…कोल्हापुरात देशमुख सरांच्या बाबतीत मात्र कधीच असं घडलं नाही…इथं पत्रकारांनी सरांच्या काम आणि स्वभावावर जितकं प्रेम केलं…त्याच पद्धतीने सरांनी देखील मैत्री जपलीय….

माझ्या आयुष्यभर लक्षात राहील असा एक किस्सा घडला होता..गेल्या वर्षी 6 ऑगस्टची पहाट…एबीपी माझाच्या मुंबईतल्या ऑफिसमधून कोल्हापूरला येत होतो….रात्री 1 वाजता समजलं पुराचं पाणी महामार्गावर आलं आणि मार्ग बंद केला…गाडी किणी टोल नाक्यावर थांबवली गेली…मी देशमुख सरांसह जिल्ह्यातल्या सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांना मेसेज टाकला… वृत्तांकन करण्यासाठी मला कोल्हापुरात पोहचणे गरजेचं आहे काही करता येईल का?…जे ऑनलाईन होते त्यांना फोन केला. म्हणाले जिथं आहेस तिथेच थांब..तू येऊच शकत नाहीस कोल्हापुरात.. आता अवघड झालं होतं…थेट कोल्हापूरच्या दिशेनं चालत निघालो… बरोबर सात वाजता देशमुख सरांचा मेसेज आला, कुठं आहेस? मी नेमकं पाणी आलं होतं त्याच ठिकाणी होतो…उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना फोन दे म्हणाले…त्यांचं बोलणं झाल्यानंतर लगेच दोन ते तीन पोलीस बांधवांनी हाताला धरून आम्हाला पाण्याच्या पलीकडे पोहचवले… चालत, धावत जसं पोहचता येईल तसं तावडे हॉटेलच्या उड्डाण पुलावर पोहचलो…आणि मग कोल्हापुरातल्या महापुराची भीषणता महाराष्ट्रासमोर ठेवली…

दुसरा एक किस्सा म्हणजे, कोरोना योद्धा देशमुख दाम्पत्याची मला एकत्र मुलाखत घ्यायची होती…सर यासाठी मुळात तयारच नव्हते पण माझा प्रयत्न काही मी सोडला नाही….सलग पाच दिवस आमची वेळ जुळून येत नव्हती…कधी सर कामात व्यस्त असायचे तर कधी मॅडम सीपीआरमध्ये असायच्या… शेवटी एक दिवस सकाळी चहा नाश्त्यालाच घरी गेलो आणि मुलाखत घेतली… त्यावेळी लक्षात आलं की दोन चिमुकल्यांना आत्या किंवा मामांकडे ठेवून हे देखमुख दाम्पत्य कोरोनाशी लढा देत होतं…संपूर्ण कोल्हापूर पोलीस दल आणि कोल्हापूर जिल्हा माझं कुटुंब आहे…त्यामुळे मी थांबून चालणार नाही हे सरांचं वाक्य होतं…

मी कोकणात अडकल्यानंतर डॉ. अभिनव देखमुख सरांनी संपर्क साधण्यासाठी केलेले प्रयत्न मी कोल्हापुरात आल्यानंतर खूप जणांकडून ऐकले…मी रेंजमध्ये आल्यानंतर सरांचा आलेला मेसेज खूप उर्जा देणारा होता. १५ दिवसांपूर्वी सरांना सहज विचारलं, कोल्हापूरकरांना तुम्हाला सोडायचं नाही पण तुम्हाला तरी कोल्हापूर सोडताना आवडेल का? सर तीन चार सेकंद शांत झाले… यावरून लक्षात येत की डॉ. देशमुख सरांचं आणि कोल्हापूरचं नातं किती घट्ट धाग्यांनी बांधलं आहे… असो बदली हा कामाचा भाग आहे… त्याला पर्याय नाही… पण सर तुम्ही कायम कोल्हापूरकरांच्या मनात राहिलात आणि इथून पुढे देखील राहाल..!
जय हिंद!!!
Vijay Kesarkar (लेखक एबीपी माझा वृत्तवाहिनीत पत्रकार आहेत)

Team Lokshahi News