Categories: अध्यात्म सामाजिक

विठ्ठल रुक्मिणी मंदिराबाबत समितीने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

पंढरपूर | प्रकाश आंबेडकर यांच्या पंढरपुरातील आंदोलनाची दखल घेत मंदिरे लवकरच उघडण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी मंदिर ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेत राज्यसरकारच्या भूमिकेलाच विरोध दर्शवला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मंदिर उघडण्याबाबत पंढरपुरात आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी उघडण्यात आले. यानंतर आंबेडकरांनी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही मानले.

दरम्यान, राज्यातील प्रार्थनास्थळे सुरू करण्यासाठी सरकारने १० दिवसांची मुदत मागितली आहे. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती ठाकरे यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. १० दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपुरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा आंबेडकर यांनी दिला. मात्र, मंदिर समितीनेच ३० सप्टेंबरपर्यंत मंदिर न उघडण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

Team Lokshahi News