कोल्हापूर | राज्यातील तमाम ऊस उत्पादक शेतकरी वर्गाला उत्सुकता लागून राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या १९ व्या ऊस परिषदेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कोरोनामुळे ही तारीख लांबली होती. अखेर २ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर ही परिषद पार पडणार आहे. याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.
यंदाचा गळीत हंगाम जाहीर झाला असून स्वाभिमानीची ऊस परिषद झाल्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नसल्याचा इशारा यापूर्वीच संघटनेने दिला होता. चालू वर्षी ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची शिरोळ येथे राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांवर दबाव टाकत सह्या घेतल्या कारणाने आता रस्त्यावर आणि कायदेशिर अशी दोन्ही बाजूने लढाई करावी लागणार आहे.
राज्य सरकारने १ नोव्हेंबर नंतर राज्यातील लॉकडाऊन आणखी शिथील करण्याविषयी सूतोवाच केले आहे. याच पार्श्वभूमीवर ऊस परिषदेसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिण्यात आले असून ऊस परिषदेला परवानगी मागण्यात आली आहे. तसेच ऊस परिषदेत ऊस दर ठरत असल्याने ऊस परिषदेचे गरज ही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
बैठकीला प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, वेभव कांबळे, आण्णासो चौगुले, मिलींद साखरपे, आदिनाथ हेमगीरे, अजित पोवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.