Categories: Featured प्रशासकीय

शासकीय मेगाभरतीला ब्रेक, ‘या’ कारणामुळे सरकारने घेतला निर्णय

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत असून त्याचा फटका नवीन भरतीला बसणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात घोषित करण्यात आलेली मेगाभरती यामुळे पुन्हा लांबणीवर पडल्याची माहिती आहे. आरोग्यविभागाशिवाय कोणतीही नवीन भरती होणार नसून मेगाभरतीला ब्रेक लागल्याने सरकारी नोकरीची आस लावून बसणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

राज्याच्या तिजोरीत दरमहा सरासरी २६ हजार कोटींचा महसूल जमा होणे अपेक्षित असताना तो सध्या एप्रिल मे या दोन महिन्यात अवघा १३ हजार कोटींवर आला आहे. यापार्श्वभूमीवर राज्यसरकार खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असून आरोग्य विभागाशिवाय कोणतीही पदभरती करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

राज्य सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये सुमारे १६ लाख अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या नऊ लाखांच्या आसपास आहे. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत दरमहा १२ हजार कोटी रूपये द्यावे लागतात. वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल यांनी यासंदर्भात माहिती दिलीय.

दरम्यान राज्य सरकारने २०२०-२१ मध्ये तीन लाख नऊ हजार कोटी रूपयांच्या महसूली उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र मागील ३ महिन्याच्या काळात अपेक्षित महसूल मिळण्यात मोठ्या अडचणी आल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या पदभरतीला ब्रेक लावण्यात आला आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: maharashtra job