maratha-reservaion
कोल्हापूर | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर (ता. २३) सप्टेंबरला कोल्हापूरात राज्यव्यापी गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत राज्यातील पन्नास मराठा संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, साने गुरुजी वसाहतीमधील रावजी मंगल कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता परिषदेस सुरवात होणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी दिली आहे.
सुरेश पाटील म्हणाले, “मराठा आरक्षण मिळविण्यासाठी गेल्या २५ वर्षापासून अथक प्रयत्न चालू आहेत. अनेक आंदोलने, मूक मोर्चे आणि ५० मराठा बांधवांचे बलिदान इतक्या मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले. मात्र ज्या मागणीसाठी इतकी वर्षे संघर्ष केला, त्यालाच स्थगिती मिळाल्याने मराठा समाजात आता असंतोष पसरला आहे. राज्यातील मराठा समाजातील मुला-मुलींच्या नोकरी व शिक्षणाचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे आता आंदोलनाला पर्याय नसून आंदोलनाची नेमकी दिशा ठरविण्यासाठी गोलमेज परिषद होत आहे. त्यात मराठा संघटना, वकील, ज्येष्ठ इतिहास संशोधकांची मते ध्यानात घेऊन दिशा निश्चित होईल. शासनाला अल्टिमेटम दिला जाईल. नंतर आंदोलनाशिवाय पर्याय असणार नाही.”
यावेळी, मराठा समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्रातील ४८ खासदार व मराठा समाजातील १८१ आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे..
सरकारनं आमच्या मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात…
१. आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत शासनाने मुली-मुलींचे शैक्षणिक शुल्क भरावे.
२. सारथी’साठी पाचशे कोटींची तरतूद करावी, आरक्षणाच्या आंदोलनात ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख अनुदान देण्यासंबंधी कालावधी निश्चित करावा.
३. जिल्ह्यात मराठा वसतिगृह उभारावे.
४. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे काम लवकर सुरू करावे.
५. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी.
६. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.