कोल्हापूर | लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अशीच बेरोजगारीची वेळ आल्याने कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हाताचं काम सुटल्यामुळे मुलांचे पालनपोषण आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाल्याने दारुच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या एकानं चक्क आपल्या मुलालाच तृतीयपंथीला ५ लाखांत विकलं. उत्तम पाटील असे या बापाचं नाव असून, यामुळे कोल्हापूरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, उत्तम पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव येथील रहिवासी असून तो कामानिमित्त कोल्हापुरातील गंगावेश परिसरात राहतो. तो चांदी कारागीर आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये त्याच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली. त्यातच पत्नी आजारी असल्याने तिचा उपचार कसा करायचा? मुलाचा सांभाळ कसा करायचा? असे अनेक प्रश्न उत्तमला भेडसावत होते. यातूनच तो दारुच्या आहारी गेला होता.
दारुच्या आहारी गेल्याने उत्तम आर्थिक अडचणीत सापडला होता. तसेच त्याच्यावर कर्जही झालं आहे. काही दिवसानंतर उत्तम याने पत्नी आणि लहान मुलाला माहेरी पाठवले. तर मोठा मुलाला तृतीयपंथीयांच्या ताब्यात दिलं. मे महिन्यात नोटीसीद्वारे एका तृतीयपंथीनं ५ लाख रुपयांच्या बदल्यात या मुलाला आपल्याकडे ठेवल्याचे उघड झालं आहे.
दरम्यान, काही दिवसांनी मुलाच्या आजोबांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या नातवाला परत आणण्यासाठी प्रयत्न केले. तृतीयपंथी यांच्याकडे गेल्यावर त्यांनी पाच लाख द्या आणि मुलाला घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर संबंधित आजोबांनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोलिसांकडे धाव घेतली. कोल्हापूर शहराच्या उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मुलाचा ताबा घेऊन त्याला बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले आहे. दरम्यान आता मुलाच्या कस्टडीचा निर्णय न्यायालयात होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.