कोल्हापूर | कोरोनाच्या सुरवातीच्या टप्प्यात सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हणटलेलं ‘Go कोरोना Go’ हे वाक्य चांगलच लोकप्रिय झालं होत. आता तेच वाक्य कोल्हापूर जिल्ह्यातील एका बळीराजाने आपल्या शेतातील भाताच्या रोपवाटिकेतून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. घरची दोन एकर शेती असणाऱ्या आजरा तालुक्यातील साळगाव इथल्या सचिन केसरकर या शेतकऱ्यांने त्याच्या भावाच्या मदतीने ही कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे.
सचिनचे शिक्षण दहावी पर्यंत झाले असून तो नोकरीनिमित्त काही वर्षे मुंबईमध्ये राहिलेला आहे, परंतु वडिलांच्या अचानक झालेल्या निधनानंतर त्याने गावी परतून आपल्या जन्मदात्या आईसोबत काळ्या आईचीही सेवा करायला सुरवात केलीय. सचिन गेली सात – आठ वर्षे शेती करत असून तो सध्या त्याच्या कुटूंबियांसमवेत शेतीत काम करतोय. सध्या त्याने एक एकर शेतीत इंद्रायणी भाताचा बियाणे प्लॉट घेतला असून यामध्येच त्याने ‘Go कोरोना Go’ चा संदेश साकारला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सगळीकडे कोरोनाचा कहर सुरू झाला आणि सचिनचा चुलत भाऊ पुण्यातून गावी परतला, पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहिलेल्या त्याच्या भावाने गावी आल्यानंतर सचिनच्या मदतीने शेतातच ‘Go कोरोना Go’ हा संदेश साकारत कोरोनाला पळवून लावण्याचा सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. सध्या या केसरकर बंधूनी भात शेतीत कोरलेला ‘गो कोरोना गो’ चा संदेश सगळीकडे व्हायरल होत असून त्यांच्या या सामाजिक जाणिवेचं कौतुकही केलं जात आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत असताना त्याविषयी जनजागृती करणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. भारतात सध्या कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झाल्याचे सांगण्यात येत असून कोरोनाचा फैलाव ग्रामीण भागात देखील पहायला मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता देखील कोरोनाच्या बाबतीत सर्तकता बाळगून काळजी घेत असल्याचे या फोटोतून अधिक चांगल्या पध्दतीने दिसून येत आहे.