Categories: अधिक

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे निधन; कुस्ती क्षेत्रावर शोककळा

कोल्हापूर | पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचे प्रकृती अस्वास्थामुळे आज पहाटे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. प्रकृती बरी नसल्याने ते कोल्हापूरातील एका खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. 

गेल्या काही दिवसांपासून श्रीपती खंचनाळे आजारी होते. त्यामुळे कुटूंबियांनी त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. तेथे तीन दिवस उपचार घेऊन देखील त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना महावीर कॉलेज परिसरातील दुसऱ्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.  तेथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

हिंदकेसरी खंचनाळे मूळचे महाराष्ट्र – कर्नाटक सिमेवरील एकसंबा गावचे होते. १९५९ साली त्यांनी पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करून हिंदकेसरीची गदा पटकावली होती. याचवर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर या मल्लाला दोन मिनिटात चितपट करून महाराष्ट्र केसरीची गदाही पटकावली केली होती. त्यांच्या या कर्तृत्वाने कोल्हापूरचे नाव उज्जवल झाले. खंचनाळे यांनी या प्रमुख कुस्त्यांबरोबर १९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या होत्या.

खंचनाळे यांच्या कुस्तीची जडणघडण शाहुपूरीतील तालमीत झाली. त्यामुळे त्यांचे  पार्थिव शाहुपूरीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तेथून त्यांच्या राहत्या घरी रूईकर कॉलनी येथे नेण्यात येईल. खंचनाळे यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: The first Hindkesari Shripati Khanchanale passed away हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे