Categories: बातम्या हवामान

बापरे ! आणखी ४ महिने पाऊस कोसळणार; ‘हे’ आहे कारण..!

मुंबई | यंदाच्या वर्षी सुरू असलेला पाऊस फेब्रुवारी २०२१ पर्यंत थांबणार नसल्याचा दावा हवामान तज्ञांनी केला आहे. हवामान तज्ञांच्या या दाव्यामुळे सर्वांचीच चिंता वाढल्याचे दिसत आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी पुढचे चार महिने दक्षिण आशियात पाऊस धुमाकुळ घालू शकतो असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. 
(या आठवड्याचा हवामान अंदाज सविस्तर पाहण्यासाठी IMD Weather वर क्लिक करा)

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि दक्षिण आशिया कृषी हवामान फोरमचे सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांच्यामते, ऑगस्ट २०२० पासून दक्षिण आशियावर ‘ला’ निनाचा प्रभाव आहे. ला निना म्हणजे सतत पावसाला पोषक वातावरण तयार होणे. सध्या महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेशात पडत असलेला पाऊस त्याचाच परिणाम आहे. यामुळे दक्षिण आशियावर पुढचे ४ महिने सातत्यानं पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हवामान संस्था आणि शास्त्रज्ञांशी झालेल्या चर्चेत ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या चर्चेत अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातल्या निवृत्त हवामान शास्त्रज्ञांचाही समावेश असल्याची माहिती साबळे यांनी दिली आहे.

सध्या महाराष्ट्राच्या भूगर्भात आणि धरणांमध्ये उच्चांकी पाणीसाठा आहे, अशा स्थितीत डोक्यावर सातत्यानं पावसाचे सावट मोठ्या धोक्याला निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे सरकारने जलतज्ञ आणि धरणतज्ञांसोबत चर्चा करुन तातडीने धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्याची गरज अाहे. महाराष्ट्र सरकारने भरलेल्या धरणांमधील पाणीसाठा १० ते १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची गरज आहे. सध्याच्या अतिपावसाच्या कालखंडात जुन्या धरणांचे आणि त्यांच्या कार्यक्षमतेचे तातडीने ऑडिट करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. 

सध्या, पावसामुळे काढणीला आलेल्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांसोबत मातीही वाहून गेली आहे. मोठ्या प्रमाणात माती खरडल्याने येत्या काळात शेतीच्या नापिकीचा धोका वाढला आहे. तसेच यामुळे रब्बीच्या पेरण्याही बराच काळ लांबण्याची शक्यता आहे. 

  • येत्या काही दिवसात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता
  • ला निना चा प्रभावाने आणखी ४ महिने सतत पावसाची शक्यता
  • दक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तानमध्ये अवकाळी पावसाची शक्यता
Team Lokshahi News