कोल्हापूर। कुष्ठरोगाविरुध्द अखेरचे युध्द या घोष वाक्या नुसार ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहीम यशस्वी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले. स्पर्श कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती अभियान राबविण्यासाठी जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, जिल्हा क्षयरोग मुक्त आणि कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे. लवकरात लवकर रुग्ण शोधणे आणि लवकरात लवकर उपचार करणे या विषयी मोहीम राबवावी. यंदाचे घोष वाक्य कुष्ठरोगाविरुध्द अखेरचे युध्द हे असून सर्वांनी कुष्ठरोग निर्मुलनासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे. शाळा, महाविद्यालय यामधून जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी.
सुरुवातीला सदस्य सचिव तथा आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे सहायक संचालक डॉ. प्रकाश पाटील आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मानसी कदम यांनी संगणकीय सादरीकरण करुन सद्यस्थितीबाबत माहिती दिली