Categories: प्रशासकीय सामाजिक

‘या’ नव्या योजनेमुळे गावांच्या विकासाला मिळणार भरघोस निधी..!

Lokshahi News Network :
मुंबई | पंचवीस हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावांच्या विकासासाठी ‘नगरोत्थान’ योजनेच्या धर्तीवर ‘ग्रामोत्थान’ योजना तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील जवळपास तीनशे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार असून नियोजन आणि ग्रामविकास विभागाद्वारे ही योजना तयार करण्यात येणार आहे.

राज्यात पंचवीस हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांची संख्या तीनशेच्या आसपास आहे. या गावात केवळ घरपट्टी कर संकलनाद्वारे विकास करताना निधीच्या कमतरतेमुळे अनेक मर्यादा येतात. या योजनेच्या माध्यमातून सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्त्यांची कामे, दिवाबत्ती, बाग बगीचे विकास यांसारख्या प्रश्नाची सोडवणूक होऊन नागरी सुविधांची कामे केली जाणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन या योजनेला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे. मोठ्या गावांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय असून, ‘ग्रामोत्थान’ योजनेमुळे मोठ्या गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

Team Lokshahi News