Categories: ब्लॉग

कोल्हापूरची साधी माणसेच आता पुढे येऊ लागली…

त्या आजोबांचे वय ८७. एरव्ही त्यांचा नैसर्गिक मृत्यु कधीही होणारच होता. पण कोरोनाच्या काळात त्यांचा मृत्यु झाला. आणि त्या वारकरी पंथातल्या आजोबांच्या मृत्युला कोरोनाच्या संशयाने घेरले.. एरव्ही पुढे पुढे करणारे, बघता बघता मागे सरू लागले. लांब उभे राहून “डायरेक्शन “करू लागले. आजोबांच्या पार्थिवाला हात लावायला एक माणूस नाही. आजीच पार्थिवाशेजारी बसुन एकदा आपल्या निश्चल पडलेल्या धन्याकडे आणि एकदा गल्लीच्या टोकाला लांबवर हाताची घडी तोंडावर रुमाल बांधुन उभ्या राहिलेल्या सग्या सोयऱ्यांकडे डबडबलेल्या डोळ्यांनी पहात होत्या. पाच सहा तास अशा अवस्थेत ही माऊली तशीच बसुन होती. नंतर सचिन चव्हाण महादेव नरके तौफिक मुललाणी संतोष पाटील रोहन स्वामी अब्दुल मलबारी आणि बैतुलमाल कमिटीचे कार्यकर्ते आले. गल्लीतले तरुण आले आणि आजोबांना अंत्यविधीसाठी नेले…

बुधवारी तर हिदायत मणेर याने एकटयानेच आपल्या मित्राच्या मृतदेहाला अग्नी दिला. अशोक रोकडे, हर्षल सुर्वे यांनी तर कोविड सेंटर उभे केले आहे. शाहिर आझाद नायकवडीने आपली मारूती व्हॅन शववाहिकेसाठी दिली आहे. संताजी घोरपडे तर मोफत जंतुनाशक फवारणी करुन घर निर्जंतुक करून देतो आहे. अभय देशपांडे यांनी गरजुना ऑक्सिजन मशिन उपलब्ध केली आहेत.  ड्युटीवरून घरी गेलेले डॉक्टर, पोलिस, परिचारिका, वॉर्डबॉय घरात मुलांना जवळ घेऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. वडगावचे पोलिस निरीक्षक राजेंद्र काळे यांनी कोरोनातुन बरे होऊन पुन्हा प्लाझ्मा  दान केला आहे. कोरोनाने कहर माजवलेल्या काळात हे त्यांच्या त्यांच्या ताकदीने सुरू आहे. अशी असंख्य माणसे पिक्चरमध्ये न येता राबत आहेत. वर उल्लेख केलेले केवळ एक उदाहरण आहेत.

मात्र या निमित्ताने नक्कीच काही प्रश्न पुढे आले आहेत. शववाहिका लवकर का येत नाही? रुग्णवाहिका वेळेत का मिळत नाही.  मिनीटा मिनीटाला मृतदेह वाहून न्यावा लागतो एवढी वाईट कोल्हापुरची परिस्थिती नक्की नाही. पण कोरोनाच्या नावावर नक्की काही जण मुद्दाम गोंधळ निर्माण करत आहेत. काहींनी धंदा उघडला आहे. आपले अपयश कोरोनावर ढकलत आहेत. आणि त्याहून महत्वाचे म्हणजे एरव्ही माना खुपसुन, एकमेकाला मागे ढकलून फोटोत घुसणारे , डिजीटलवर  झळकणारे, रोज पेपरात दिसणारे,   ते काही ठराविक “चमको” आता या संकटाच्या काळात मृतदेह उचलायला, अंत्यविधीला मदत करण्यासाठी कोठे आहेत?

सुधाकर काशीद (लेखक ज्येष्ठ पत्रकार असून प्रसिध्द वृत्तपत्रसमुहातून सेवानिवृत्त आहेत)

Sudhakar Kashid