Categories: Featured

…आणि लंगोट देखील घेवून न गेलेला कोल्हापूरच्या लाल मातीतला पैलवान हिंदकेसरी झाला!

भारतभर कोल्हापूरच्या लाल मातीतील कुस्तीचा डंका गाजवणारे ख्यातनाम नाव म्हणजे माजी हिंद केसरी पैलवान गणपतराव आंदळकर. “कुस्ती हाच माझा प्राण आणि तालीम हा माझा श्वास” हे ब्रीदवाक्य म्हणत त्यांनी संपूर्ण आयुष्य कुस्तीला वाहिले. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती पढंरी म्हणून कोल्हापूरला नावलौकिक मिळवून दिला. या कोल्हापुरात १९५० साली गणपतराव सांगली जिह्यातल्या शिराळा तालुक्यातील पुनवत गावातून कुस्ती शिकण्यासाठी आले. “मोतीबाग” तालमीत बाबासाहेब वीर यांच्याकडे कुस्तीची तालीम सुरु केली. जन्मजात मिळालेल्या बळकट शरीर यष्ठीवर मेहनत घेऊन त्यांनी कुस्तीचा नियमीत सराव केला. जयपराजयाची फिकीर न करता शेकडो कुस्त्या लढल्या आणि जिंकल्या.

ही गोष्ट १९६० सालची. दूसऱ्या हिंदकेसरी स्पर्धा मुंबईच्या वल्लभभाई पटेल मैदानावर भरल्या होत्या. पहिल्या हिंदकेसरी स्पर्धेची गदा श्रीपती खंचनाळे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला आली होतीच. आत्ता वेळ होती दूसरी गदा देखील महाराष्ट्राच्या वाट्याला येण्याची. यावेळी महाराष्ट्राच्या लाल मातीत एक नाव घुमत होतं, आणि ते म्हणजे गणपतराव आंदळकर..! या सहा फुटाहून अधिक उंचीच्या पैलवानाला अनेकांनी प्रतिस्पर्ध्यांच्या छाताडावर बसलेलं पाहीलं होतं. गणपतराव आंदळकरांची कुस्ती म्हणजे निकाली कुस्ती अस समीकरण होतं. गणपतराव आदंळकर आपल्या चपळ डावपेचासाठी प्रसिद्ध होतेच. त्याचबरोबर त्यांनी अनेक देशी विदेशी पैलवानांबरोबर दोन दोन हात करत कुस्तीच्या मातीत आपलं नाव कमावलं होतं. 

असं असलं तरी १९६० साली आयोजित करण्यात आलेल्या हिंदकेसरी स्पर्धेत गणपतराव आंदळकर यांचा समावेश नव्हता. मुंबईत स्पर्धा सुरू झाल्या आणि इतर पैलवानांसोबतच गणपतराव आंदळकर देखील या स्पर्धेत सहभागी झाले. पण हा सहभाग फक्त स्पर्धा पाहण्यापुरता मर्यादित होता. ठरल्याप्रमाणे स्पर्धेचे पहिले दोन दिवस पार पडले. तेव्हा असं लक्षात आलं की, यावेळीची गदा महाराष्ट्राच्या ताब्यातून जाणार. उत्तरेतल्या ताकदवान पैलवानांसमोर महाराष्ट्रातल्या पैलवानांचा निभाव लागणं अशक्य झालं होतं. महाराष्ट्राची माघार होणार हा अंदाज आल्यानंतर तत्कालीन मंत्री बाळासाहेब देसाई यांनी गणपतराव आंदळकरांना बोलावून घेतलं. आणि ते आंदळकरांना म्हणाले, पैलवान तुम्हाला कुस्ती करायची आहे..! यावर आंदळकर म्हणाले, साहेब मी लंगोट पण आणली नाही. जेवण करून आलोय. मी सहभागी होणार हे मला काही सांगण्यात आलं नव्हतं.. आत्ता कस करावं…?
तसे महाराष्ट्राची लाज राखायची असली तर तुला कुस्ती करायलाच पाहिजे असे बाळासाहेबांनी आंदळकर यांना सांगितले. बाळासाहेबांचे हे वाक्य ऐकताच आंदळकरांनी फक्त एक दिवसाची मुदत मागितली, आणि मी उद्या सहभागी होतो असे सांगितले. 

महाराष्ट्राची लाज राखण्याची जबाबदारी स्विकारलेले गणपतराव आंदळकर दूसऱ्या दिवशी संपुर्ण तयारीनिशी आले. हिंदकेसरी गटात एकूण सोळा मल्ल खेळत होते. पहिल्या दोन कुस्त्यांमध्ये आदळकरांनी बाजी मारली. तिसरी कुस्ती लागली ती बनातसिंग पंजाबी या कसलेल्या मल्लासोबत. अखेरच्या टप्यात गुणांवर आंदळकर विजयी झाले. आणि सर्व टप्पे पार करत फायनलला पोहचले. फायनल होती खडकसिंग पंजाबी विरुद्ध गणपतराव आंदळकर. खडकसिंग अंगापिंडाने मजबूत पैलवान होता. त्याच्या ताकदीपुढे सहजासहजी निभाव लागणं कठिण काम होतं. पण आंदळकरांची डावांमधली पकड घट्ट होती, आणि त्यांना आपल्या चपळतेवर अधिक विश्वास होता. 

वल्लभभाई स्टेडियमवर ही मानाची हिंदकेसरी स्पर्धा पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. खुद्द मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते. सामना सुरू झाला आणि बघता बघता गणपतराव आंदळकरांनी खडकसिंग पंजाबीला अस्मान दाखवलं. अशा रितीने लंगोट देखील घेवून न गेलेला पैलवान मैदानात उतरला आणि हिंदकेसरी झाला.  

हिंदकेसरी – पै. गणपतराव आंदळकर
  • १९५८ मध्ये पाकिस्तानचा पैलवान नासिर पंजाबी याला खासबाग मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने आंदळकर यांनी धूळ चारली.
  • १९६० मध्ये पंजाबचे पैलवान खडकसिंग यांचा पराभव करून हिंद केसरीची गदा मिळवली आणि संपूर्ण भारतात कोल्हापूरच्या लालमातीला नावलौकिक मिळून दिले.
  • १९६२ मध्ये जकार्ता एशियाड स्पर्धेत ग्रीको रोमन गटात त्यांनी सुवर्णपदक पटकावले, तर फ्री स्टाईलमध्ये रौप्य मिळवले.
  • १९६४ मध्ये त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व केले.
  • गणपतरावांनी आपल्या पूर्ण कारकीर्दत २०० हुन अधिक कुस्त्या लढल्या. ४० पेक्षा जास्त कुस्तीत पाकिस्तान मधील मल्लांना त्यांनी धूळ चारली आहे.
  • देशभरात ख्यातनाम कुस्तीपटूंची नावं गाजत असताना गणपतरावांनी कोल्हापूरच्या लाल मातीचा डंका वाजवता ठेवला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत श्रीपाद खांचाळे (पहिले हिंद केसरी ), श्रीरंग जाधव, बनातसिंग पंजाबी यांच्यासह अनेक ख्यातनाम मल्लांशी झुंज दिल्या आहेत.

गणपतराव यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सौष्ठव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, शिव छत्रपती पुरस्कार, महाराष्ट्र गौरव आणि कोल्हापूर भूषण पुरस्कार मिळाले आहेत. कुस्तीची परंपरा निष्ठेने जपणारा मल्ल आणि वस्तादाच्या ताबंड्या मातीचा गौरव म्हणून दिला जाणारा “राजर्षी छत्रपती शाहू महाराज” पुरस्काराने २०१४ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. अशा या गुणी पैलवानाचे १६ स्पटेंबर २०१८ रोजी वयाच्या ८६व्या वर्षी पूणे येथे निधन झाले. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: कुस्ती मल्ल विद्या कोल्हापूर कुस्ती मल्ल विद्या गणपतराव आंदळकर मोतीबाग तालीम यशवंतराव चव्हाण लालमाती कुस्ती हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर