Categories: Featured मनोरंजन

या ‘११’ ठिकाणी इतिहासाची मोडतोड करत बनवला आहे ‘तानाजी’ चित्रपट

शिवाजीराजांचा एक जिवलग सहकारी तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर बॉलिवूडमध्ये गाजत असणारा भव्य चित्रपट तयार केल्याबद्धल निर्माता ओम राऊत यांचे प्रथमतः अभिनंदन! कारण सर्वसामान्य कुटुंबातील मावळ्याचा दैदिप्यमान इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राष्ट्रीय स्तरावर आणल्याबद्दल याचे श्रेय निर्मात्याला द्यायलाच हवे. परंतु सिनेमॅटीक लिबर्टीचा स्वैरपणे गैरवापर करून वास्तव इतिहासाची मोठ्या प्रमाणात मोडतोड केलेली आहे. ही मोडतोड अजाणतेपणातून झालेली नाही, तर एक मोठा उद्देश ठेवून करण्यात आलेली आहे, हे यातील अनेक प्रसंगांतून स्पष्ट होते:

1. हिंदू-मुस्लीम लढाई

शिवाजीराजांचे स्वराज्य रयतेचे होते ते कोणत्याही एका जात-धर्माचे नव्हते, तत्कालीन लढाई राजकीय होती, असे प्रतिपादन सेतुमाधव पगडी देखील करतात. ती धार्मिक म्हणजे हिंदू-मुस्लिम अशी नव्हती, ती जर तशी असती तर सर्व हिंदू शिवाजीराजांकडे आणि सर्व मुस्लिम मोगलांच्याकडे असायला हवे होते. परंतु तसे इतिहासात नाही. औरंगजेबाकडून कोंढाणा किल्यावर तानाजीविरुद्ध लढणारा उदयभान हा राजपूत आहे, तर त्याच्यासोबत युद्धात ठार झालेले ५०० राजपूत होते. याबाबत समकालीन कृष्णाजी अनंत सभासद लिहितात, “पाचशे राजपूत ठार झाले.” त्यामुळे या चित्रपटात उदयभान आणि त्याचे सैन्य मुस्लीम वेषात दाखवून हे युद्ध जणू काही हिंदू-मुस्लीम असे होते, हे दाखवून ध्रुवीकरण करण्याचा हेतू स्पष्ट होतो.

मध्ययुगीन काळात शेतकऱ्यावर अन्याय होत होता, पण प्रत्यक्ष अन्याय करणारा वर्ग हा प्रशासनातीलच होता. केंद्रीय सत्तेत जरी निजाम, मोगल, आदिलशहा असले तरी गावगाड्यात वतनदार-मिरासदार हे राज्यकारभार करत असत, असे लालजी पेंडसे आणि नरहर कुरुंदकरांनी मांडले आहे. परंतु या चित्रपटात तानाजी-उदयभान ही लढाई जणू काही भगवा विरुद्ध हिरवा अशीच होती, असे ठासून मांडलेले आहे. वर्तमानातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा तानाजी चित्रपटात लादलेली आहे, असे मला वाटते.

2. ‘मर्द’ मावळा

सदर चित्रपटात तानाजीच्या तोंडी ‘मर्द’ मावळा हा शब्द सातत्याने येतो, पण तो इतिहासाला धरून नाही. इतिहासात फक्त मावळा हाच शब्द आहे. त्याला मर्द विशेषण लावण्याचा अट्टाहास का? यातून मानसिकता लिंगभेदाची दिसते. पुरुष, स्त्री आणि तृतीयपंथी असा भेदभाव स्पष्ट होतो. मुळात लिंगभेदाचा परिणाम गुणवत्तेवर किंवा कर्तृत्वावर अजिबात होत नाही, हे अलीकडच्या प्रगत शास्त्राने सिद्ध केलेले आहे. जसे पुरुष शूर, पराक्रमी, बुद्धिमान असतात, तसेच स्त्रिया आणि तृतीयपंथी देखील शूर, पराक्रमी आणि बुद्धिमान असतात, असे फेमिनिस्ट सांगतात.

विशेषतः मावळा हा शब्द मावळाई या इंद्रायणी खोऱ्यातील मातृसत्ताक परंपरेतून आलेला आहे, असे थोर प्राच्यविद्यापंडित डी. डी. कोसंबी यांचे ‘मिथ अँड रियालिटी’ या पुस्तकात प्रतिपादन आहे. त्यामुळे मावळा हा शब्द महिलांचा सन्मान करणारा शब्द आहे, त्याला मर्द म्हणून स्त्रिया, तृतीयपंथीयांचा उपमर्द केलेला आहे. पितृसत्ताक स्त्रीदास्य मानसिकता यातून दिसून येते.

3. जिजाऊंची पूजा

सदर चित्रपटात एक मुस्लीम सरदार जिजामातेला कोंढण्यावर पूजा करू न देताच गड ताब्यात घेतो व त्यांना गड खाली करण्यास सांगतो. याप्रसंगी जिजामाता कोंढाणा जिंकून घेतल्याशिवाय पायात चपला घालणार नाही, अशी शपथ घेतात, असा प्रसंग रंगवलेला आहे. याला ऐतिहासिक आधार नाही.

4. ‘ओम’ चिन्ह कुठून आलं?

शिवाजी राजांचा ध्वज भगवा होता, पण तो रयतेचा कल्याण करणारा होता. तो धार्मिक द्वेष निर्माण करणारा नव्हता. तो मशीद पाडणारा, इतर धर्मीयांचा द्वेष करणारा नव्हता. शिवकाळात ध्वजावरती ‘ओम’ चिन्ह असल्याची नोंद नाही. तानाजीच्या ढालीवर ‘ओम’ चिन्ह असल्याचा उल्लेख नाही, परंतु मोगल सरदार उदयभान ‘ओम’ चिन्ह असणाऱ्या तानाजीच्या ढालीचे तुकडे -तुकडे करतो, यातून धार्मिक द्वेष ठासून भरण्याचा प्रयत्न आहे.

5. ‘महाराज देव भोळे नव्हते’

शिवाजीराजे बुद्धिप्रामाण्यवादी होते, त्यांचा विश्वास कर्तृत्वावर होता, त्यांनी भविष्य पंचांग पाहिले नाही. त्यांचा राजाराम नावाचा मुलगा पालथा जन्मला, तेव्हा त्यांनी ‘हा दिल्लीची पातशाही पालथी घालील’ म्हटल्याचं सभासदाने लिहिले आहे. त्यांनी सागरी किल्ले बांधले. बेदनुरवर समुद्रमार्गे स्वारी करून सिंधुबंदी तोडली. जिजाऊ मासाहेबांनी सती न जाता निर्भीडपणे कार्य केले. यावरून स्पष्ट होते, की जिजामाता-शिवाजीराजे बुद्धिप्रामाण्यवादी होते. ते ग्रंथप्राण्यावादी किंवा देवभोळे नव्हते. त्यांना आपल्या परंपरेचा अभिमान होता, परंतु अनिष्ट चालीरीती त्यांनी अंगीकारल्या नाहीत.

तुळजाभवानी, महादेव इत्यादी लोकदैवतांबाबत त्यांना आदर होता, परंतु यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागतो, हे वास्तव जाणण्याबाबतची प्रगल्भता त्यांच्याकडे होती. ते प्रवाहपतीत नव्हते. याबाबत शिवचरित्र अभ्यासक त्र्यंबक शेजवलकर म्हणतात, “शिवाजीराजे पुराणमतवादी नसून प्रागतिक सुधारणावादी होते. ते श्रद्धाळू होते हे निर्विवाद, पण ते शहाणे आणि विवेकी होते, हे त्याहून सत्य. अनुष्ठान बळावर मनोरथ पूर्ण करण्याचा भाबडा दैववाद त्यांच्याजवळ निश्चितच नव्हता.” अशी वस्तुस्थिती असताना चित्रपटात जिजामाता-शिवाजीराजे यांना सतत देवपूजा करताना दाखविणे, हा इतिहासाचा विपर्यास आहे.

6. नाकात नथ कशी?

सिनेमॅटिक लिबर्टी गृहित धरली तरी मध्ययुगीन मराठा स्त्रीला नाकात नथ नव्हती, की जी तानाजीच्या पत्नीच्या नाकात आहे. प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांच्या तात्त्विक भूमिकेतून सांगायचे म्हटले, तर सदर चित्रपटात अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राला तिलांजली देऊन ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र ओतप्रोत वाहत आहे. उत्तरेकडील आलेले राजपूत काळे आणि दख्खनच्या पठारावरील मावळे गोरेपान? हे मानवशास्त्रीय सौंदर्यशास्त्राला धरून नाही.

7. तानाजीचा मोठा वाडा

नागीण तोफ कोंढाण्यावरून राजगडाकडे रोखलेली आहे. याला ऐतिहासिक संदर्भ नाही. तानाजीचा मोठा वाडा दाखवलेला आहे. मुळात शिवरायांनी सर्वसामान्य कुटुंबातील मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. तानाजी असेच सामान्य कुटुंबातील स्वकर्तृत्वावर पुढे आलेले जिवलग सुभेदार होते, त्यांच्याकडे सरंजामी बडेजाव नव्हता, जो या चित्रपटात दाखवलेला आहे.

8. महाराजांवर कुबडी फेकणारे तानाजी

तानाजी मालुसरे यांचे शिवाजी राजावर-स्वराज्यावर जिवापाड प्रेम होते, जिजामातेबद्दल त्यांना नितांत आदर होता. ते प्रखर स्वराज्यनिष्ठ होते. पण याचा अर्थ असा होत नाही की ते शिवाजी राजांवर कुबडी फेकून मारण्याचा उपमर्द करतील. हा प्रसंग अनैतिहासिक आहे.

9. मालुसरे आणि पिसाळ

तानाजी आणि उदयभान यांची हातघाईची लढाई झाली, त्यावेळेस तानाजीचा उजवा हात तुटला, असा उल्लेख नाही. त्यांची ढाल तुटल्याचा उल्लेख सभासदांनी केला आहे. हातघाईच्या लढाईत दोघेही कोसळले; त्यानंतर सूर्याजी मालुसरे यांनी मोठा पराक्रम गाजविला, पण ते या चित्रपटात दाखविले नाही. वास्तव नाकारून अवास्तव मात्र भरपूर आहे. सिनेमॅटीक लिबर्टीची संधी शेलारमामांना द्यायला हवी होती.

पिसाळ म्हणजे फितूरच असे मिथक जाणीवपूर्वक तयार करण्यात आलेले आहे. सदर चित्रपटात चंद्राजी पिसाळ हे शिवाजी राजांशी फितुरी करून मोगलांना मदत करतात, असे दाखविले आहे. मुळात ही घटना अनैतिहासिक आणि काल्पनिक असून ती पिसाळ परिवाराची बदनामी करणारी आहे.

10. ‘एक मराठा लाख मराठा’

‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा मराठा क्रांती मोर्चातील म्हणजे या चार वर्षातील आहे. ती सतराव्या शतकातील तानाजीच्या मुखात घालून निर्माता-दिग्दर्शकांनी इतिहासाचा विपर्यास केलेला आहे. आधुनिक संकल्पना इतिहासावर लादून त्यातील गांभीर्याला तडा गेलेला आहे.

11. फितूर न्हावी?

छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यासाठी सर्व जाती धर्मातील मावळ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारली. पन्हाळा वेढ्यात शिवाजी काशीद हे प्रतिशिवाजी होऊन शत्रूच्या गोटात गेले आणि तेथे त्यांना स्वराज्यासाठी बलिदान द्यावे लागले. अफजलखान भेटीच्या प्रसंगी जिवाजी महाले यांनी शिवाजी राजांवर चालून आलेल्या सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला. क्षणाचा विलंब झाला असता तर महाराजांचा कदाचित अंत झाला असता.

शिवाजीराजांचे जिवाला जीव देणारे, स्वराज्यासाठी जीव धोक्यात घालणारे शिवाजी काशिद आणि जिवाजी महाले हे नाभिक समाजातील होते. ही वस्तुस्थिती असताना देखील तानाजी चित्रपटात एक न्हावी फितुरी करतो आणि उदयभानला मदत करतो, असे रंगविले आहे. या पात्राला कोणताही ऐतिहासिक आधार नाही.

शिवाजीराजे, तानाजी यांची भूमिका करणारी पात्रं त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे उत्तम सादरीकरण करणारी नाहीत, कारण ती खूपच संथ वाटतात. त्यामानाने उदयभानची भूमिका उत्तम झालेली आहे. शिवाजीराजे-तानाजी राकट, चपळ, काटक होते. पण यात अनेक ठिकाणी खूपच निवांत दिसतात.

एकूणच सिनेमॅटिक लिबर्टीचा स्वैरपणे वापर करून सदर चित्रपटात शिवइतिहासाची मोठ्या प्रमाणात मोडतोड केलेली आहे. सनातनी राष्ट्रवादाच्या पायाभरणीसाठी तानाजी मालुसरे यांच्या लोककल्याणासाठीच्या संघर्षाचा वापर केला जातोय, हे मात्र निश्चित!

(श्रीमंत कोकाटे हे शिवचरित्राचे अभ्यासक आहेत. लेखातील विचार त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Chattrapati Shivaji Maharaj cinema Tanaji Malusare Tanhaji movie तानाजी चित्रपट तान्हाजी