Categories: Featured कृषी

कांदा दराचा तिढा!

लासलगाव। मागील ४ महिन्यापासून कांद्याच्या दरात झालेली वाढ आता कमी होऊ लागली असून दर उतरू लागले आहेत. सध्या विदेशातून आलेला कांदा भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच नवीन उत्पादित झालेला कांदाही बाजारात येऊ लागला लागल्याने दर खाली आले आहेत. परंतु विदेशी कांदा ग्राहकांच्या पसंतीस पडत नसून एकदा त्याची चव चाखल्यानंतर पुन्हा हा कांदा खरेदी करण्यास भारतीय ग्राहक राजी होत नाहीत. त्यामुळे कांद्याच्या दरातील ही घसरण सध्याच्या घडीला सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देणारी आहे.

विदेशातून आलेला कांदा दिल्ली बाजारपेठांमध्ये ग्राहक नसल्याने पडून असल्याचेही सांगण्यात येत आहे. भारतातील इतर बाजारपेठांमध्ये देखील हीच स्थिती असल्याचे सांगण्यात येतय. विदेशी कांद्याची घाऊक बाजारातली किंमत १५ रुपये किलोच्या दरम्यान आहे. तर भारतीय कांदा सध्या ३० ते ४५ रूपये किलो दराने विकला जात आहे. विदेशातून आणखी कांदा देशातील बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. परंतु येत्या काही दिवसात देशांतर्गत कांद्याचंही प्रमाण भारतीय बाजारपेठेत वाढल्याचे पहायला मिळणार आहे. त्यामुळे सहाजिकच विदेशी कांदा कोणी खरेदी करणार नाही. अस जरी असलं तरी विदेशी कांदा भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असल्या कारणाने त्याचा भारतीय कांद्याच्या दरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय कांद्याची आवक देखील मार्च ते ऑगस्टच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात होणार असल्याने पुन्हा कांद्याचे दर निचांकी पातळीवर येण्याची भिती आहे. तसे झाल्यास पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडून कांदा पिकाच्या लागणी कमी करतील. परिणामी पुढील वर्षी पुन्हा कांद्याच्या दरात आणखी वाढ झाल्याचे पहायला मिळेल. 

सध्या किरकोळ बाजारात ग्राहकांना कांदा खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून विदेशी कांदा कमी किमीत मिळतोय तो घ्या असे सांगितले जाते, त्याचबरोबर त्याची चव कशी आहे हे देखील सांगितले जाते. त्या तुलनेत भारतीय कांदा पुरेसा उपलब्ध नसल्याचे कारण सांगून अजूनही तो ७० ते ८० रूपये किलो दर विकला जात आहे. वास्तविक घाऊक बाजारात सध्या कांद्याचे दर कमी झाले आहेत. तरी देखील सर्वसामान्य ग्राहकांना चढ्या दरानेच कांदा खरेदी करावा लागत आहे.

“विदेशी कांदा पिकवण्याचा प्रयोगही महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांनी करून पाहिला होता. नाशिकमधील शेतकऱ्यांनी १९९९-२००० च्या दरम्यान इराणमधून आणलेल्या कांद्याचे बियाणे लावून पीक घेतले होते. कालांतरान या कांद्याचे उत्पादनही चांगले आले, पंरतु या कांद्याची चव कुणालाही पसंत पडली नाही, त्यामुळे चांगले उत्पादन मिळत असूनही शेतकऱ्यांनी या कांद्याचे पीक घेणे बंद केले. त्यामुळे भारतीय ग्राहकांना आवडणाऱ्या चवीचा कांदा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत कांद्याचे दर चढेच राहणार असल्याचा अंदाज आहे”.

कृषी विशेषज्ञांच्या मते किमान चार वर्षातून एकदा अशी परिस्थिती उद्भवते, जेव्हा कांद्याचे भाव गगनाला भिडतात. आता पहिल्यांदाच इतक्या प्रदीर्घ काळासाठी कांद्याचे भाव चढेच राहिले आहेत. याला कारणेही तशीच आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. नवीन लागवडी झाल्या नाहीत, ज्या झाल्या त्याही वाया गेल्या. त्यामुळे साधारणतः ऑक्टोबर २०१९ पासून कांद्याच्या दरात वाढ व्हायला सुरवात झाली. भारतीय बाजारपेठेत १०० ते १५० रूपये किलो कांद्याचे दर झाल्याचे यानंतर पहायला मिळाले.

कांदा उत्पादनाचे सर्वाधिक नुकसान हे पावसाचा फटका बसल्याने होते. यामुळे कांद्याच्या दरावर विपरीत परिणाम होतात. मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात झालेले बदल हे त्याचे ताजे उदाहरण आहे. २०१९च्या नोव्हेंबरपर्यंत पावसाने मध्य तसंच दक्षिण भारतात ठाण मांडल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे अनेक ठिकाणी कांद्याच्या पेरणीलाही उशीर झाल्याचे पहायला मिळाले.

  • सरकारने टर्की, इजिप्त, इराण आणि कजाकिस्तानमधून कांद्याच्या आयातीला मंजुरी दिली.
  • या ठिकाणाहून आलेल्या कांद्याला विशेष मागणी नसल्याने भारतीय कांद्याचे दर आजही चढेच आहेत.
  • कांदा आयात करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे.
  • बाहेरून कांदा आणला गेला तर इथे पिकणाऱ्या कांद्याचं काय? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
  • सरकारने कांदा आयातीचा निर्णय उशिरा घेतला आहे.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: crop insurance crop loan farm insurance Farm loan insurance against live stock Lasalgaon onion market loan waiver Maharshtra onion farmer onion market onion rate