Categories: राजकीय

महाराष्ट्रात एकाच दिवशी आंदोलन नाही; मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाच्या तारखा जाहीर

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थिगितीनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची काल (१५ स्पटेंबर) राज्यस्तरीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. यावेळी, संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन न करण्याचा महत्वाचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आला आहे.

“मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन केले जाणार नाही. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यात ही आंदोलने होतील. यादरम्यान, बंद पुकारला जाईल. त्याप्रमाणे, येत्या २० सप्टेंबरला मुंबईतीतील विविध ठिकाणी ठिय्या आंदोलनाची शक्यता आहे. १७ सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली जातील, तर २१ सप्टेंबरला सोलापूर जिल्ह्यात बंद आणि आंदोलनाची हाक दिली जाणार आहे”, 

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी यापूर्वी जाहीर केल्यानुसार येत्या २३ सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यातील पुढील आंदोलनांबाबतचा निर्णय आणि दिशा ठरविण्यात येणार आहेत. या गोलमेज परिषदेत महाराष्ट्रातील जवळपास ५० हून अधिक मराठा संघटना सहभागी होणार आहेत. या गोलमेज परिषदेसाठी राज्यभरातून अनेक तज्ञ मंडळी, विविध मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. 

Team Lokshahi News