Categories: कृषी

सातबारातील ‘या’ बदलांमुळे सर्वसामान्यांना मिळणार दिलासा

मुंबई | तब्बल आठ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येणार असून आता सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात येणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. प्रत्येक गावासाठी युनिक कोड, प्रत्येक सात बारावर वॉटर मार्क यासह शासनाचा लोगो आणि क्यूआर कोड हे सातबाराचे वैशिष्ट्य ठरणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

  • महाराष्ट्र शासनाच्या महाभुमि या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मिळवा तुमचा ७/१२ उतारा अगदी एका क्लिकवर

थोरात म्हणाले, राज्य शासनाच्या महसूल विभागामार्फत महाराष्ट्रातील ग्राम पातळीवरील महसुली लेखांकन पद्धतीत बदल करण्यात आला आहे. ब्रिटीश काळात एम.जी. हार्टनेल अँडरसन यांनी तयार केलेल्या मॅन्युअलमध्ये १९४१ मध्ये एम.जे.देसाई यांनी सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास ८ दशकानंतर राज्यात नवी महसूल रचना अंमलात येत असून सातबारामध्ये साधारण १२ प्रकारचे बदल करण्यात आले आहेत. यापुढे आता प्रत्येक गाव आणि खातेदाराला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यासोबत गाव नमुना नंबर ७ अधिकार अभिलेख पत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

गाव नमुना नंबर ७ मध्ये गावाच्या नावासोबत एलजीडी (Local Government Directory) म्हणजेच स्थानिक शासनाचा कोड दर्शविण्यात येणार आहेत. याशिवाय लागवड योग्य आणि पोटखराबा क्षेत्राचे एकूण क्षेत्र यापुढे दर्शविले जाणार आहे. सध्या अनेक उताऱ्यांमध्ये त्यांचे क्षेत्र जुळत नाही मात्र आता अशी अडचण येणार नाही. हेक्टर, आरसोबत अकृषक उताऱ्यावर चौरस मीटर नोंदले जाणार आहे. इतर हक्काच्या रकान्यात खातेदारांचे क्रमांक युनिक क्रमांकासह नोंदले जातील. सातबारा उताऱ्यातील नव्या बदलामुळे राज्यातील जमीन विषयक कामकाजात पारदर्शकता येऊन जमीन महसूलविषयक वाद कमी होण्यास मदत होईल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

७/१२ मधील महत्वाचे बदल –

  • आता गाव नमुना सातबारा व 8 (अ) मध्ये वरच्या बाजूला मध्यभागी महाराष्ट्र शासनाचा लोगो व ईमहाभूमी प्रकल्पाच्या लोगोचा वॉटरमार्क असणार आहे.
  • गावाचे नावासोबत एलजीडी कोड ( लोकल गर्व्हेमेन्ट डिरेक्‍टरी) कोड असणार आहे.
  • लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र यासोबत एकूण क्षेत्र (अ+ब) स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात येणार आहे.
  • शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक दर्शविले जाणार आहे.
  • खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात कंसात नमूद केला जात असे. तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे.
  • मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ईकराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या. आता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात जाणार आहे.
  • नमुना 7 वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार.
  • भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असे दर्शविण्यात येणार आहे.
  • नमुना 7 वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकाण्याचे खाली शेवटचा रकान्यात दर्शविण्यात येणार सर्व जुने फेरफार क्रमांक नवीन रकान्यात एकत्रितरीत्या दर्शविण्यात येणार आहेत.
  • शेती क्षेत्रासाठी व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुन्यात बदल होणार.
  • बिनशेती क्षेत्रासाठीच्या नमुनावर 12 छापला जाणार नाही. तो फक्त नुमना 7 असणार आहे.
  • क्षेत्र अकृषिक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न. 12 ची आवश्‍यकता नाही. अशी सूचना त्यावर छापण्यात येणार आहे.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: 7/12 उतारा ७/१२ उतारा 7/12 उतारा महाराष्ट्र राज्य 7/12 उतारे 8 अ उतारा सात-बारा (7/12) पाहणे