Categories: Featured आरोग्य प्रशासकीय सामाजिक

कोल्हापूर : ‘या’ सुविधा तात्काळ कार्यान्वित कराव्यात – जिल्हाधिकारी

कोल्हापूर : कोव्हिड-19 रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध असणारा औषध तसेच ऑक्सिजन साठा, संभाव्य मागणी, रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट किट, पीपीई किट, ग्लोव्हज, साधन सामग्री आणि मनुष्यबळ या सर्वांचा आढावा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला. गडहिंग्लज येथील उप जिल्हा रुग्णालयात 100 सिलेंडर क्षमतेचा ऑक्सिजन जनरेटर बसविण्याबाबत आणि इचलकरंजी येथील आयजीएममध्ये 6 केएलचा लिक्विड ऑक्सिजन टँक बसविण्यास मान्यता देण्यात आली. या सुविधा तात्काळ कार्यान्वित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पीपाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ही आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वैद्यकीय अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पी पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस बी शेळके, डॉ. अनिता सैबन्नावर, प्रभारी निवासी उप जिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी उपलब्ध साठ्याबाबत माहिती घेतली. ते म्हणाले, रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट किट, पीपीई किट याबाबत मागणी करुन साठा करुन ठेवावा. आवश्यक असणारी औषधे, रेमडीसिव्हीर इंजेक्शन्स, झिंक, व्हीटॅमिन सी याचा देखील साठा करुन ठेवा. आजरा, चंदगड येथील कोव्हिड काळजी केंद्रांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑक्सिजन लाईनचे काम पूर्ण करावे. सीपीआरमधील दूधगंगा इमारतीमध्ये २०० आणि आयजीएममध्येही १०० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरु करण्याबाबत आवश्यक मनुष्यबळ आणि साधन सामग्रीबाबत प्रस्ताव द्या. अधीष्ठाता डॉ. मस्के यांनी स्थानिक स्तरावर ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांबरोबर करार करुन कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

उद्योगांना 15 टक्के ऑक्सिजन पुरवठा करण्यास मुभा

जिल्ह्यातील सर्वच ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना पुढील पाच दिवस 15 टक्के ऑक्सिजन उद्योगांना, तर 85 टक्के वैद्यकीय कारणासाठी पुरवठा करण्यास मुभा द्यावी. त्यानंतर 20 आणि 80 टक्के अशा प्रमाणात पुरवठा करण्यास परवानगी द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. इंगळे यांना दिली. परंतु, जिल्ह्यात वैद्यकीय वापराच्या पुरवठ्याची कमतरता भासणार नाही, याप्रकारे ऑक्सीजनचा पुरवठा नियंत्रित करण्याचे निर्देशही देण्यात आले.

Team Lokshahi News