मुंबई | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांपैकी २७.३८ लाख खातेदारांना लाभ देण्यात आला आहे. २० जुलै २०२० अखेर यासाठी १७ हजार ६४६ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनाने ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली होती. एकूण संख्येपैकी जवळपास ८३ टक्के खातेदारांना लाभ देण्यात आला आहे. तर उर्वरित १७ टक्के शेतकऱ्यांच्या निधी वितरणासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी – मुख्यमंत्री :
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत या योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. योजनेत ज्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ देणे बाकी आहे त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबविली जावी, जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टींकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निधी वाटपाची प्रक्रिया पुन्हा सुरु :
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी २१ हजार ४६७ कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी १७ हजार ६४६ कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून देण्यात आला आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी गावपातळीवर ग्रामपंचायतींमध्ये तसेच बँकांच्या शाखा स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी २०१९-२० या आर्थिक वर्षात जवळजवळ १९ लाख खातेदारांना ११ हजार ९९३ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण ५६५३ कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत निर्गमित केलेल्या यादीतील उर्वरित ५.५२ लाख खातेदारांनी त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांना योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ मिळेल व त्यांच्या कर्जखात्यावर रक्कम जमा होईल. मार्च २०२० मध्ये राज्यातील काही जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यामुळे लागू झालेली आचारसंहिता व त्यानंतर लॉकडाऊनची परिस्थिती यामुळे काही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणे शक्य झाले नव्हते. परंतु आता ही प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यात आलेली आहे.