Categories: Featured राजकीय

यासाठी सतेज पाटलांना हवे होते कोल्हापूरचे पालकमंत्रीपद!

कोल्हापूर। कोल्हापूरच्या जिल्ह्याच्या राजकारणात भारी ठरलेल्या सतेज पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील आपल्याकडेच खेचून घेण्यात यश मिळवलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करण्यात मोठी भुमिका बजावलेल्या सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा सिध्द केला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर त्यांच्या मंत्री होण्याची शक्यता बळावली. ते विधानपरिषदेचे आमदार असल्याने त्यांना काहीप्रमाणत विरोधही झाला. परंतु मंत्रीपदाच्या शर्यतीत सतेज पाटील यांनी बाजी मारत आपले वर्चस्व दाखवून दिले होते. 

दरम्यान राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्ता जाहीर झाल्या. मात्र याठिकाणी त्यांची नियुक्ती भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. कोल्हापूरचे पालकमंत्रीपद सतेज पाटील यांनाच मिळणार अशीच अटकळ बांधण्यात येत होती. परंतु नियुक्ता झाल्यावर त्यांना भंडारा जिल्हा देण्यात आला. या दरम्यानच्या काळात कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळालेल्या महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिल्याने कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाबाबत तिढा निर्माण झाला. 

यातून जिल्ह्यातील मंत्री असलेल्या हसनमुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली. यातून एकमेकांविरोधात सुप्त संघर्षही पहायला मिळाला, परंतु याठिकाणी देखील सतेज पाटील यांनी मात देत पालकमंत्रीपद आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवले. 

पालकमंत्री पद हाती आल्यानंतर त्या जिल्ह्याची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आपल्या ताब्यात ठेवता येते. अधिकारवाणीने कामे करून घेता येतात. प्रशासनावर वचक ठेवता येतो, तसेच कार्यकर्त्यांना देखील चांगले बळ देता येते. त्यामुळेच कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली होती. अखेर यात सतेज पाटील यांनी बाजी मारली असून हसन मुश्रीफ यांना अहमदनगरच्या पालकमंत्रीपदीच समाधान मानावे लागले आहे. 

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: bank insurance crop insurance farm insurance guardian minister of kolhapur Hasan Mushrif satej patil पंतप्रधान किसान सन्मान योजना पीक विमा योजना शासकीय योजना समृध्दी योजना सरकारी योजना