वर्धा। महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण निशुल्क आहे. तरीही अल्लीपूर येथील एका केंद्रावर याकरिता पैसे आकारण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाने या केंद्राची मान्यता रद्द केली आहे. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहिर करण्यात आली आहे. या यादीत ४६ हजार ४२४ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण गरजेचे आहे. सामूहिक सुविधा केंद्र, आधार, आपले सरकार, सेतु केंद्रावर ही सुविधा निशुल्क आहे. हे काम करणाऱ्या केंद्रांना शासन प्रत्येक शेतकऱ्यासाठी बारा रुपयांचा परतावा करणार आहे. तसे आदेशही निर्गमीत करण्यात आले आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली होत असल्याची बाब समोर येत आहे.
अल्लीपूर येथील आपले सरकार केंद्रावर देखील आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांकडून १०० रुपयांची आकारणी होत होती. हा प्रकार एका शेतकऱ्याने मोबाईलवर चित्रीत करून सोशल मिडीयावर व्हायरल केला. त्यानंतर प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेत या केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची बाब समोर आली असून अशी फसवणूक करणाऱ्यांची तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.