Categories: Featured राजकीय

‘हिजडा’ शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर मी सांगते, तृतीयपंथियाने निलेश राणेंना सुनावलं!

मुंबई। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी सध्या विरोधकांवर टीकेचा भडिमार सुरू केलाय. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ते विरोधक आणि राज्यसरकारचा चांगलाच समाचार घेत असल्याचे दिसत आहे. नुकतीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निलेश राणे यांनी टीका केली होती. त्याचबरोबर निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा चक्क ‘हिजडा’ असा उल्लेख करत ट्वीट केले होते. यावरुन तृतीयपंथीय असलेल्या सारंग पुणेकर यांनी प्रत्युतर दिले असून निलेश राणे यांना चांगलंच सुनावलं आहे.

सारंग पुणेकर यांनी याबाबत ट्विट केले असून ’हिजडा’ या शब्दाचा अर्थ, इतिहास माहीत नसेल तर तो मी सांगते. पण आपली बालिशबुद्धी जगाला दाखवू नका. जेव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरवैरा पळतं, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला. हिजडा शब्द मागे घ्या, नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा सारंग पुणेकर यांनी या ट्विट मधून दिला आहे.

निलेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधकांवर कडाडून टीका करत आहे. यातूनच निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. एवढंच नाही तर त्यांना हिजडा असं संबोधलं. यावरून सारंग पुणेकर चांगल्याच संतापल्या आहेत. निलेश राणे यांनी तृतीयपंथीयांचा अपमान केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वंचित, दुर्लक्षित व समाजाने नेहमीच अन्याय केलेला तृतीयपंथी वर्ग आहे. समाज कंटकांकडून तृतीयपंथियांना कायम हिणवलं जातं. मात्र, चक्क माजी खासदार निलेश राणे यांनीही तृतीयपंथियांना हिणवणं चुकीचं आहे. यावरुन सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

Team Lokshahi News