Categories: Featured

कडकनाथ कोबंडीपालनात पैसे अडकल्याने पप्पा आत्महत्येची भाषा करतात; तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी पत्र

उस्मानाबाद। कडकनाथ कोंबडीपालन घोटाळ्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे जिवन उध्दवस्त झाले असून यामुळे आत्तापर्यंत राज्यातील काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. अशाच एका पिडीत शेतकऱ्याकडून घरी सतत आत्महत्येची भाषा वापरली जात असल्याचे ऐकून भयभीत झालेल्या त्यांच्या तिसरीत शिकणाऱ्या मुलीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मदतीसाठी पत्र लिहिले असून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांनेही यामुळे आत्महत्या केली आहे.

धनश्री आश्रुबा बिक्कड असे पत्र लिहिणाऱ्या मुलीचे नाव असून ती जि. प्रा. शाळादेवळालीता. कळंबयेथील शाळेत शिक्षण घेते. धनश्रीच्या शाळेत २६ जानेवारी निमित्त शुभेच्छा पत्रांची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात धनश्रीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. वडील नेहमी आत्महत्येची भाषा करतात. मला याची भिती वाटते. त्यामुळे वडिलांना मदत करण्याची आर्त हाक धनश्रीने या पत्रातून मुख्यमंत्र्यांना दिली आहे.

धनश्रीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिलेले पत्र

माझे नाव धनश्री आशुबा बिक्कड आहे. मी तिसरी वर्गात जि. प्रा. शाळा देवळाली ता. कळंब येथे शिकत आहे. साहेब माझे पप्पा शेतकरी आहेत. पण आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्या वेळेला पाऊसच नसतो. मग शेतात काहीच धान उगवत नाही. माझे पप्पा नेहमी टेन्शन मध्ये असतात. सारखे चिडचिड करतात. मम्मी वर रागवतात. माझ्यावर पण चिडतात. त्यांच्या तोंडून एकच शब्द निघतो. त्या कडकनाथ घोटाळ्याने वाटोळं केलं. कडकनाथ कोंबड्यांच्या घोटाळ्यात लय पैसे अडकले. नेहमी मेलेलं बरं, मरणा शिवाय आता दुसरा पर्यायच नाहीअसं सारख बोलतात. मला घाबरायला होते. मला फार भिती वाटते. आमच्या शाळेत पेपर येतो. त्यात शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बातम्या येतात. आमच्या पप्पाला समजून घ्या. तुम्ही समजून सांगा. त्यांना त्या कडकनाथ कोंबड्यासाठी दिलेले पैसे परत मिळवून द्या. प्लीज माझ्या पप्पाला मदत करा. आमच्या सरांनी सांगितलं, मुख्यमंत्री साहेबांना २६ जानेवारी निमित्त शुभेच्छा पाठवा. म्हणून मी हे पत्र तुम्हाला लिहिले

आश्रुबा बिक्कड यांनी इस्लामपूर येथील महारयत अॅग्रो कंपनीत ४ लाख रूपये गुंतवून कडकनाथ कोंबडीपालन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पैसे गुंतवल्यानंतर कंपनीकडून फसवणूक झाल्याने नेहमी तणावाखाली असतात. त्यामुळे ते घरी सतत आत्महत्येची भाषा करत असून त्यांना वेळीच न्याय मिळणे गरजेचे आहे. याप्रकरणी त्यांनी इस्लामपूर आणि मुंबईतील आंदोलनात देखील आपली समस्या मांडली होती. परंतु अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. धनश्रीने पत्रात मांडलेली व्यथा आणि विदारक वास्तव तिच्या शिक्षकांनी वाचलं. त्यानंतर तिच्या शिक्षकांनी धनश्रीच्या वडीलांना फोन करून आत्महत्या न करण्याचा सल्ला दिलाय.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: bank loan crop insurance Dhanshree write a letter to cm Thackeray farm insurance get online insurance government scheme insurance for fraud kadaknath scam mutual fund कडकनाथ घोटाळा महारयत अॅग्रो कडकनाथ घोटाळा