कोल्हापूर | लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या अंबाबाईच्या मंदिरातील प्राचीन ठेवा तब्बल ६२ वर्षानंतर खुला होणार आहे. मंदिरातील १९५८ साली बुजवण्यात आलेले ‘मनकर्णिका’ कुंड परत खुले होणार असून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने हे कुंड खुले करण्याच्या कामाला आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे.
सन १९५८ साली बुजविण्यात आलेले हे कुंड देवस्थान समिती पुन्हा खुले करणार असून यानिमित्ताने मंदिरातील तीर्थकुंडाचे वैभव भक्तांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी ते म्हणाले, “देवस्थान समितीने अतिशय चांगला निर्णय घेतला असून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या कामाला आता प्रारंभ झाला आहे. लवकरात लवकर हा प्राचीन ठेवा कोल्हापूरकराबरोबरच पर्यटकांसाठीही भुरळ घालणारा ठरेल, यात शंका नाही.”
यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, नगरसेविका हसीना फरास, आदिल फरास, विनायक फाळके, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, उपसचिव शितल इंगवले, अभियंता सुदेश देशपांडे ,सुयश पाटील, व्यवस्थापक धनाजी जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
१९५८ साली बुजविण्यात आले होते तीर्थकुंड
मंदिराच्या आवारात पूर्वी काशी आणि मनकर्णिका अशी २ जिवंत झरे असणारी नैसर्गिक कुंड होती. या कुंडात बारमाही पाणी होते. ही कुंड ६० फूट लांब ६० फूट रुंद उतरत्या पायऱ्यांच्या रचनेत होते. त्याकाळी पूजेनंतरचे पाणी कुंडात सोडण्यात येत असे. भाविकांसाठी ही कुंड पवित्र होती. कालांतराने मंदिर परिसरात दाटीवाटी होऊ लागली. कुंडात कचरा फेकण्यात येऊ लागला. कुंडांमध्ये गाळ साचू लागल्याने गाळाचा उपसा होऊ लागला. मात्र त्यानंतर कुंड बुजवून ती जागा वापरासाठी होऊ शकते असा विचार पुढे आला. त्याप्रमाणे १९५८ साली ही कुंड बुजविण्यात आली. हा प्राचीन ठेवा पुन्हा खुला होणार असून १९५८ नंतर भाविकांना तो नजरेस पडणार आहे.