कोल्हापूर | महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या महिला बचत गटाची स्वतंत्र बँक स्थापन करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ‘उमेद’ संस्थेच्यावतीने आयोजित ऑनलाइन मेळाव्यात मंत्री मुश्रीफ यांनी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
महात्मा गांधींचे ग्रामविकासाबाबतचे विचार अनुकरणीय आहेत. जोपर्यंत गावे स्वच्छ, समृद्ध आणि स्वावलंबी होत नाहीत तोपर्यंत विकास ही संकल्पना अपुरी आहे. गाव खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण बनवायचे असेल तर आधी महिलांचे सक्षमीकरण होऊन त्यांचा आर्थिक विकास झाला पाहिजे. महाराष्ट्रातील महिला बचत गटांच्या माध्यमातून दरवर्षी सरासरी ७,७०० कोटी रुपये राज्य सरकार खर्च करीत आहे. या माध्यमातून पन्नास लाखाहून अधिक कुटुंबे जोडली गेली आहेत.
महाराष्ट्रातील महिला बचत गटांची चळवळ सरकारी अभियान म्हणून न राहता लोकचळवळ म्हणून पुढे येणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढचे पाऊल म्हणून महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी बचत गटांची स्वतंत्र बँक स्थापन करणार असल्याचे मुश्रीफ यांनी यावेळी स्पष्ट केले. या ऑनलाइन मेळाव्याला राज्यभरातून दीड लाखाहून अधिक महिलांनी उपस्थिती लावली होती.