Categories: गुन्हे बातम्या राजकीय सामाजिक

विवेक रहाडेच्या आत्महत्येचे ‘हे’ आहे खरे कारण.. बनावट सुसाईड नोटचा पर्दाफाश!

बीड | बीडमधील विवेक रहाडे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची सुसाईड नोट बनावट असल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. विवेकने नीटची परीक्षा अवघड गेल्याने आत्महत्या केली आहे. परंतु त्याच्या नावे सोशल मिडीयावर व्हायरल झालेली सुसाईड नोट, मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचा फायदा घेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्याचा प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे.

काय होती सुसाईड नोट
बीड तालुक्यातील केतुरा येथील या तरूण विद्यार्थ्याच्या नावे व्हायरल झालेल्या या सुसाईड नोट मध्ये ‘मी कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा असून जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मला वैद्यकीय प्रवेश मिळणार नाही, माझ्या घरच्यांची खासगी महाविद्यालयात शिकवण्याची ऐपत नाही, त्यामुळे मी माझे आयुष्य संपवित आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला मराठ्यांची मुलांची किव येईल आणि माझे मरण सार्थकी लागेल, या आशयाचा मजकूर होता.

विवेकच्या आत्महत्येनंतर मराठा आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींसह विविध घटकांनी सरकारला दोषी ठरवत टिकेची झोड उठविली होती. दरम्यान सुसाईड नोटमधील हस्ताक्षर व उत्तर पत्रिकेतील हस्ताक्षर हे जुळत नसल्याचे हस्ताक्षरतज्ज्ञांच्या तपासणीत उजेडात आले. त्यामुळे कुणीतरी जाणीवपूर्वक हा उपद्व्याप केल्याचे दिसून आले. अज्ञातांनी विवेकच्या मृत्यूचा फायदा घेण्यासाठी त्याच्या नावे बनावट सुसाईड नोट तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल केली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मिडीयाद्वारे सार्वजनिक शांततेचा भंग करण्याच्या उद्देशातून हे कृत्य केल्याचे यात म्हटले आहे.

Team Lokshahi News