Categories: आरोग्य बातम्या राजकीय सामाजिक

कोरोनामुक्त झाल्यानंतर ‘या’ मंत्र्याची जंगी मिरवणूक; उत्साही कार्यकर्त्यांमुळं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. असे असताना काही लोकप्रतिनिधी मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या या मेहनतीवर कसे पाणी ओततात याचा प्रत्यय नुकताच कागल मध्ये पहायला मिळाला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढलेली जंगी मिरवणूक हे त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे. या मिरवणुकीत कोरोनामुक्तीच्या नावाखाली  करण्यात आलेला इव्हेंट पाहता कोरोना म्हणजे केवळ गैरसमज आहे. असा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. 

कोरोनाच्या काळात मंत्री मुश्रीफ यांनी मोठा जबाबदारपणा दाखवत घरी भरणारा जनता दरबार बंद करण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी अहमदनगरचे पालकमंत्री पद आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री पद निभावताना त्यांना अनेकदा बाहेर जिल्ह्यात दौरे करावे लागले. या दरम्यानच्या काळात त्यांनी २-३ वेळा स्वतःला क्वारंटाईन देखील केल्याचे पहायला मिळाले. राज्याची जबाबदारी सांभाळत असतानाच मुश्रीफ यांनी कागलमध्येही लक्ष ठेवले. कोरानाचा वाढता प्रादुर्भाव ध्यानात घेत ६ ते १६ सप्टेंबर दरम्यान लॉकडाऊन केला. यामुळे इतर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेऊन वेळोवेळी लॉकडाऊन करत लोकांचे आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यानच्या काळात खुद्द मुश्रीफ यांनाच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालांतराने कोरोनाशी दोन हात करून बाहेर पडल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी मात्र कागल शहरात मोठा इव्हेंट करत मुश्रीफ यांची जंगी मिरवणुकच काढली. कागल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गैबी चौक इथपर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत सोशल डिस्टंसिंगचा मात्र पुरता फज्जाच उडल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे लोका सांगे ब्रम्हज्ञान… या म्हणीचा प्रत्यय आल्याचीच चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सध्या सुरू आहे. 

Team Lokshahi News