Categories: आरोग्य सामाजिक

शिवसेनेच्या ‘या’ खासदाराने स्वतःचे घरच दिले लोकांना क्वारंटीनसाठी, समाजासमोर घातला नवा आदर्श!

कोल्हापूर। जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल माने (शिवसेना) आपले स्वतःचे घरच लोकांना क्वारंटीनसाठी उपलब्ध करून देत नवा आदर्श घालून दिला. खासदार माने यांनी निगेटिव्ह अहवालानंतर कराड येथून रुकडीत परतणाऱ्या विद्यार्थ्याला स्वत:चं घर देवून ‘आपुलकी गृह’ या कोल्हापुरी पॅटर्नची सुरुवात स्वत:पासून केली. आपुलकी गृहाच्या माध्यमातून गावातील भाऊबंदकीतील कडवटपणा संपवून बंधूभाव वाढीस लागेल हा संदेश या निमित्ताने खासदार माने यांनी दिला असून प्रत्यक्ष कृतीतून स्वत:चं घर देणारे ते देशातील पहिलेच खासदार ठरले आहेत. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला संस्थात्मक अलगीकरण व्हावे लागते. ही संख्या मोठी असल्याने दिवसेंदिवस ताण वाढत आहे. यावर उपाय म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी गावच्या सुरक्षिततेसाठी आणि गावच्या सहकार्यातून नव्या कोल्हापुरी पॅटर्नचा विचार दोन दिवसापूर्वी व्यक्त केला होता. यामध्ये रेड झोनमधून येणाऱ्या व्यक्तीच्या निगेटिव्ह अहवालानंतर त्याची त्याच्याच घरी राहण्याची सोय करायची आणि घरातल्या सदस्यांनी आपल्या भावकीत, शेजारी रहायचे ही त्यांची संकल्पना होती.

गृह अलगीकरणाच्या या संकल्पनेला ‘आपुलकी गृहा’चे नाव देत या कोल्हापुरी पॅटर्नला हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील स्वत:चे घर देवून आज प्रत्यक्षात उतरविले आहे. स्वत:च्या संकल्पनेची स्वत:पासूनच सुरुवात करत त्यांनी समाजाला चांगला आदर्श घालून दिला आहे. कराड येथील महाविद्यालयात अकरावी, बारावीचे शिक्षण घेणारा विद्यार्थी काही दिवसांपूर्वी आपल्या गावी रुकडीमध्ये आला. कोव्हिड केअर सेंटरमध्ये त्याच्या स्वॅबचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर आज त्याची खासदार माने यांनी स्वत:च्या घरी राहण्याची सोय केली.

‘‘संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी सुविधांवर मर्यादा येत असतात. त्याचबरोबर काही प्रमाणात भेदभाव दिसून येतो. सामाजिक अंतर म्हणजे मानसिक दुरावा नाही यातून मनावर मोठा ताण येत असतो. परंतु खासदार माने यांनी स्वत:चे घर उपलब्ध करुन दिल्याने माझ्या मनावरील ताण कमी झाला आहे,’’ अशी भावना या विद्यार्थ्याने यानिमित्ताने व्यक्‍त केली.

रुकडीचे सरपंच रफिक कलावंत यांनी याबाबत सांगितले की, गावाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या घेत आहोत. खासदार माने यांनी आपुलकी गृह ही संकल्पना केवळ मांडली नाही तर ती कृतीतून प्रत्यक्षात उतरवली, यासाठी त्यांनी स्वतःचे घर क्वारंटाईनसाठी उपलब्ध करून देत इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. निश्चितपणे ही संकल्पना गावांमध्ये वाढीस लागेल.

Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: खासदार धैर्यशिल माने