शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने उत्पादित झालेला कांदा तात्काळ विक्रीसाठी काढावा लागतो. अशावेळी मागणीच्या प्रमाणात पुरवठा वाढल्याने बाजारभाव कोसळतात आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोलाची किंमत मिळते. जर कांदा साठवून ठेवला तर बऱ्याचदा तो सडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या समस्येवर देशातील प्रसिध्द उद्योगसमूह टाटाने उत्तम तंत्रज्ञान विकसित केले असून यामुळे शेतकऱ्यांची कांदा साठवणुकीची समस्या सुटणार आहे. यासाठी टाटा स्टील कंपनीच्या मॉड्यूलर कंस्ट्रक्शन सोल्यूशन्स ब्रॅंड नेस्ट इनने देशातील पहिले कांदा साठवणूकीसाठी सोल्यूशन अॅग्रोनेस्ट आणले आहे.
टाटा स्टीलचे प्रमुख (सर्व्हीसेस आणि सोल्यूशन्स) पी. आनंद म्हणाले की, भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता आणणे गरजेचे आहे. या गोष्टीने प्रेरित होवूनच आमची एक्सपर्ट अॅग्रीकल्चर क्षेत्रासाठी कस्टमाईज्ड सोल्यूशन्स विकसीत केले आहे.
सध्या महाराष्ट्रात १ लाख हेक्टरवर कांद्याची लागवड होते. या तंत्रज्ञानामुळे हा उत्पादित झालेला कांदा मोठ्या प्रमाणावर सुस्थितीत साठवता येणार आहे. कांद्याच्या साठवणूकीसाठी तयार केलेले हे पहिले स्मार्ट वेअरहाऊस आहे. यामध्ये अद्यावत संशोधन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कांदा साठवणूकीच्या कमतरता, साठवणुकीचे निकृष्ठ साहित्य यामुळे शेतकऱ्यांचा जवळपास ४० टक्के कांदा गोदामातच खराब होतो. तसेच हवामानातील बदल, कांदा वाहतूक करताना येणाऱ्या अडचणी यामुळेही कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेवून टाटा स्टीलच्या नेस्ट इन आणि इनोव्हेट टीमने एक स्मार्ट वेअरहाऊस विकसीत केले आहेत. याच्या रचनेमुळे हवा नियंत्रीत ठेवता येते. हवा नियंत्रीत राहिल्यामुळे कांदा अधिक काळासाठी सुरक्षित ठेवता येतो. या वेअरहाऊसमध्ये खुप कमी प्रमाणात शेतीमालाचे नुकसान होते. या वेअरहाऊसमधील तापमान नियंत्रीत ठेवण्यासाठी तापमान, ओलावा आणि गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेंसर लावण्यात आले आहेत. ज्यामुळे आपल्याला कांदा खराब होण्यापूर्वीच सुचना मिळतात.