हातकणंगले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आळते येथे आज पासून तीन दिवसांच्या शंभर टक्के लॉक डाऊनला सुरवात करण्यात आलीय. या लॉकडाऊन दरम्यान सकाळी फक्त दोन तास मेडिकल व दुध वितरण वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी घरातच राहून, कोरोनोला हरवायचे असा संकल्प केला असून त्या अनुषंगाने कोरोना आपत्ती व्यवस्थापन कमिटीची बैठक सरपंच, पोलीस पाटील रियाज मुजावर, तलाठी प्रमोद पाटील, ग्रामविकास अधिकारी व्ही. टी. फोलाने व इतर सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीत आळते गाव तीन दिवसांसाठी शुक्रवार ते रविवार पर्यत शंभर टक्के लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता, आळते येथे तीन दिवसाचा कडक लॉक डाऊन करून त्याची अमंलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. हातकणंगले पोलीस, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांच्या वतीने गावात ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या तीन दिवसांच्या लॉक डाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा, दवाखाने, औषध दुकाने, व दुध वितरण वगळता इतर कुठलीही दुकाने चालू राहणार नाहीत.
बंद काळात गावातील कोणतीही व्यक्ती गावाबाहेर जाणार नाही अथवा बाहेरील व्यक्ती गावात येणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. सोमवार पासून मागील नियमांप्रमाणे लॉक डाऊन नियमित करण्यात येणार आहे.