कोल्हापूर।३० डिसेंबर।मंत्रीमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्यातून कॉंग्रेसने सतेज पाटील यांना संधी दिल्याने करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरलीय. काँग्रेस पक्षासोबत तब्बल ४० वर्ष एकनिष्ठ राहूनही पी.एन.पाटील यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय.
आमदार पी. एन. पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला असून यामुळे पीएनपाटील आणि सतेज पाटील समर्थकात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. या फोटोमध्ये एक तराजू दाखवण्यात आला असून तराजुच्या एका पारड्यात पैसे आणि दुसऱ्या पारड्यात ४० वर्षांची पक्षनिष्ठा दाखवण्यात आली आहे. यामध्ये पैशाचं पारडं हे जड असल्याने ते झुकलेलं दाखवलं आहे, तर पक्षनिष्ठतेचं वजन कमी असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा फोटो अनेक पी. एन. पाटील समर्थकांनी त्यांच्या सोशल मीडियावर स्टेटसला अपलोड केला आहे.
विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला घवघवीत यश मिळालं. यात काँग्रेसला चार ठिकाणी विजय मिळालाय. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर काँग्रेस पक्षाशी ४० वर्षाहून अधिक काळ एकनिष्ठ असलेले आमदार पी. एन. पाटील आणि विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच होती. पी. एन. पाटील यांच्यासाठी गोकुळच्या सत्ताधाऱ्यांनी तर सतेज पाटील यांच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी वरिष्ठांची भेट घेतली होती.
एप्रिल महिन्यात होणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांपैकी कोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर सतेज पाटील यांनी यात बाजी मारत राज्यमंत्रिपद मिळवलं आहे. त्यामुळे पीएन पाटील यांच्या नाराज समर्थकांनी ‘आजचा सुविचार’ या नावाने सदरचा फोटो व्हायरल केला असून तो सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.