Categories: Featured पर्यटन

कोरोना, पर्यटन २०२० आणि ग्रामीण विकासाची संधी..!

दरवर्षी २७ सप्टेंबरला साजरा होणाऱ्या जागतिक पर्यटन दिनावर यावर्षी कोरोनाचे सावट आहे. यूएन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने, लोकांना पर्यटनाचे महत्व व पर्यटन उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. मात्र आर्थिकदृष्ट्या पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या देशांची यावर्षात आर्थिक घडी पूर्णतः विस्कटून गेली आहे. यूएन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (यूएनडब्ल्यूटीओ) च्या आकडेवारीनुसार पर्यटन क्षेत्रातील १०० ते १२० दशलक्ष  नोकर्‍या कोरोना महामारीमुळे धोक्यात आल्या आहेत. २०२० च्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून यूएन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने “पर्यटन आणि ग्रामीण विकास” ही थीम आणली आहे. काळाची पाऊले ओळखून जागतिक स्तरावर ही  पर्यटन क्षेत्राकडे अधिक शाश्वत व सर्वसमावेशकपूर्ण दृष्टिकोनातून बघणे सुरु झाले आहे. 

पर्यटनाकडे केवळ आणि केवळ फिरणे या चष्म्यातून न बघता, दोन संस्कृतींमधील आदान प्रदान, समाजातील विभिन्न घटकांचा मिलाफ, एका देशास दुसर्‍या देशांशी जोडणे, एकमेकांच्या संस्कृतीशी जोडण्याची संधी या दृष्टिकोनातून बघितले जाते. मन आणि शरीर प्रसन्न करणारी गोष्ट म्हणजे पर्यटन. मात्र कोरोनामुळे आज अनोळखी व्यक्ती एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत. थायलंड सारख्या देशांची अर्थव्यवस्था पर्यटकांवर अवलंबून आहे. पण जागतिक स्तरावरील पर्यटन ठप्प झाल्याने या देशांची आर्थिक बाजू कमकुवत झाल्याचे नजरेस पडते. यूएन कॉन्फरन्स ऑन ट्रेड डेव्हलपमेंट (यूएनसीटीएडी) च्या आकडेवारीनुसार जागतिक जीडीपीत १.५ ते २.८ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. 

स्थानिक पर्यटन आणि डिजिटल परिवर्तनाचा पर्याय उपलब्ध 
डिजिटलदृष्ट्या प्रगत होत जाणाऱ्या पर्यटन क्षेत्रात स्थानिकांचा समावेश व त्यांचे सशक्तीकरण करून पर्यटनासाठी माहितीचे आधुनिकीकरण करणे येत्या काळात आवश्यक ठरणार आहे.  कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence चा) वापर करून पर्यटनामध्ये सुलभता आणणे यासारखी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय पातळीवर काम करता येणे शक्य आहे.  

आज मोबाईल आणि इंटरनेटच्या उपलब्धतेमुळे पर्यटनच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारी प्रवास योजना व तेथे राहण्याची व्यवस्था ही घरबसल्या कोणाही मध्यस्थीशिवाय करणे सहज शक्य झाले आहे. याचा ग्रामीण आणि देशांतर्गत पर्यटनास नक्कीच फायदा होऊ शकतो. यासाठी ग्रामीण पर्यटन क्षेत्रात  उपाय-योजना राबवून पर्यटनाच्या सशक्तिकरणासाठी येत्या वर्षभरात जागतिक, राष्ट्रीय व राज्य पातळीवर तात्काळ पाऊले उचलली जाणे आवश्यक आहे. 

भारतातील पर्यटन क्षेत्राला उभारीची गरज 
इंडियन चेंबर (सीआयआय) आणि हॉस्पिटॅलिटी कन्सल्टिंग फर्म हॉटेलिवेटच्या अभ्यासानुसार कोरोनाव्हायरसमुळे  देशभरातील पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. या वर्षात पर्यटन क्षेत्रात सुमारे ५ लाख कोटी रुपये किंवा ६५. ५७ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. या उद्योगातील एकट्या संघटित क्षेत्रालाच २५ अब्ज डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता या अभ्यासातून वर्तविली आहे.  सीआयआय व हॉटेलिवेटच्या अहवालानुसार पर्यटन क्षेत्रातील ही आर्थिक स्थिती चिंताजनक असून पर्यटन क्षेत्रात त्वरित उपाययोजनांची आवश्यकता आहे. भारतीय पर्यटन उद्योगातील हे आजवरचे सर्वात वाईट संकट असून देशांतर्गत पर्यटनाला ही यामुळे खीळ बसली आहे.

पर्यटन क्षेत्रातील तज्ञांच्या मते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या Resource Inventory च्या माध्यमातून डिजीटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांना घरबसल्या टूरिझमच्या विविध संकल्पना सादर करता येणे शक्य आहे. यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने ग्रामीण भागातील महत्वाच्या ठरणाऱ्या ठिकाणांची माहिती घेऊन अशी ठिकाणे सोशल मिडीया, डिजीटल मिडीयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवता येतील. व्हीडीओ, फोटो चित्रण आणि प्रत्यक्ष वर्णनासहित सादरीकरण करून ही माहिती लोकांना देता येईल. यासाठी ठराविक चार्जेस देखील आकारण्यास हरकत नाही. घरबसल्या पर्यटन विषयक विविध बाबींची अनुभुती मिळाल्याने  कोरोनानंतरच्या काळात, प्रत्यक्षात ही ठिकाणे पाहण्यासाठी, तिथली रंजक माहिती जाणून घेण्यासाठी भविष्यात पर्यटक नक्कीच भेट देतील. आणि हाच भविष्यातील पर्यटन वाढीचा भक्कम पायाही ठरेल.

Agro Tourism, Adventure, Short Road Trip
Snehal Shankar

Journalist

Share
Published by
Snehal Shankar
Tags: world tourism day