Categories: बातम्या

ब्रेकींग न्यूज : कोल्हापूर महापालिका आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांची बदली; ‘या’ आहेत नव्या आयुक्त

  • डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या जागी गोंदियाच्या जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती

कोल्हापूर | राज्य शासनाने कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली केली आहे. याबाबतचे आदेश महानगरपालिकेला नुकतेच प्राप्त झालेत. कलशेट्टी यांच्या जागी नूतन आयुक्त म्हणून कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कलशेट्टी यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झाले असले तरी त्यांच्या बदलीचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही.

नूतन आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी ४ जून २०१८ रोजी गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्विकारला होता. त्या कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या पत्नी आहेत. शैलेश बलकवडे यांची कोल्हापूर जिल्हा पोलिसप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यामुळे कादंबरी बलकवडे यांची कोल्हापूर जिल्ह्यात बदली करण्यात आल्याचे समजते.   

दरम्यान, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची फेब्रुवारी २०१९ मध्ये महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीनंतर कलशेट्टी यांनी लगेचच कामाला सुरवात करत कोल्हापूर शहर वासियांच्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. रूजू झाल्याच्या पहिल्या रविवारी त्यांनी स्वतः स्वच्छता मोहिम हाती घेत शहर स्वच्छ करण्यास सुरवात केली. त्यांच्या या कामात विविध सामाजिक संघटना देखील सहभागी झाल्या. महापूर तसेच कोरोना काळातही मल्लिनाथ कलशेट्टी यांचे काम कोल्हापूरांसाठी मोलाचे ठरल्याचे दिसून आले. 

Team Lokshahi News