Categories: Featured प्रशासकीय

राज्यातील ४५ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, ‘हे’ आहेत कोल्हापूरचे नवे पोलीस महानिरीक्षक

मुंबई | पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बहुचर्चित बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या या याद्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून आले आहे. यात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ असणारे विश्वास नांगरे पाटील यांना नाशिकच्या पोलीस आयुक्तपदावरून थेट मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेसह पोलीस आयुक्तपदावर नियुक्त करण्यात आले. तर भाजपची मर्जी असणाऱ्या रश्मी शुक्ला यांना महासंचालक दर्जाच्या अतिरिक्त पदावर नियुक्त करून दूर लोटण्यात आले.

मागील काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात महाविकास आघाडी सरकार मध्ये मानपानाचे नाट्य सुरु होते. त्यामुळे पोलिस दलातील बदल्यांची चर्चा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात झाल्याने अखेर पोलीस दलातील बदल्यांना मुहूर्त लागला. राज्यात एकूण ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या आदेशावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वाक्षरी केली. या बदल्या करताना काही अधिकाऱ्यांच्या बदल्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या असतानाही त्यांच्या बदल्या पुन्हा करण्यात आलेल्या आहेत. तर पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना अभय देण्यात आले आहे.

नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे तर अतिरिक्त पोलिस महासंचालक (लाचलुचपत प्रतिबंधक) विनयकुमार चौबे, नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून प्रताप दिघावकर यांची नियुक्ती, नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश, कोल्हापूर महानिरीक्षकपदी मनोजकुमार लोहिया, नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह, अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे.

Team Lokshahi News