Categories: Featured कृषी

केडीसीसी बॅंकेकडून जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना मिळणार ‘हा’ लाभ…

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या सभासदांसाठी चांगली बातमी दिली आहे. बँकेने ८५ वर्षे वयापर्यंतच्या जिल्ह्यातील सर्वच विकास सेवा संस्थांच्या सर्व सभासद शेतकऱ्यांना दोन लाख रुपये भरपाई करणारा व्यक्तिगत अपघाती विमा दिला आहे. या विम्याच्या हप्त्याची ९१ लाखाची सर्व रक्कम जिल्हा बँक स्वतः नफ्यामधून भरणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. बँकेशी संलग्न सेवा संस्थांचे कर्जदार आणि बिगर कर्जदार असे दोन्ही प्रकारचे शेतकरी या योजनेत समाविष्ट करण्यात आल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

अपघातांच्या या प्रकारांमध्ये रस्ते अपघातसह, सर्पदंश, पाण्यात बुडून मृत्यू, विजेच्या धक्क्याने मृत्यू, , वीज पडून झालेला मृत्यू, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात झालेला मृत्यू, शेतीकामे करताना झालेले अपघात आदी बाबींचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी, या योजनेअंतर्गत अपघाती मृत सभासदाच्या वारसाला दोन लाख रुपये भरपाई मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ५२ हजार २१० कर्जदार व बिगर कर्जदार सभासद शेतकऱ्यांना या विमा सुरक्षेचे कवच लाभले आहे. कायमचे आणि अंशतः अपंगत्व आल्यासही शेतकऱ्याला या योजनेमधून भरपाई मिळणार आहे.

या योजनेबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन स्पर्धात्मक निविदा मागवल्या होत्या. ८५ वर्षे वयापर्यंत विमासुरक्षा देणारी भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी ही कंपनी पुढे आली. वयाने जादा असलेल्या शेतकऱ्यांना याचा ज्यादा फायदा होईल, या उद्देशाने संचालक मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आज विमा कंपनीला धनादेश देऊन सुरुवात केलेली आहे, मुदत एक वर्षापर्यंत आहे. 

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गेल्या आर्थिक वर्षात १३५ कोटी रुपये ढोबळ नफा झाला आहे . त्यातूनच या बँकेचा केंद्रबिंदू असलेल्या शेतकऱ्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही योजना आणली आहे. शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेमध्ये ऑक्टोबरपासून मार्चपर्यंतचे व्याज न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बँकेने शेतकरी किंवा सोसायटीला भुर्दंड न बसविता १३५ कोटी रुपये नफ्यामधून तरतूद केली आहे. याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हीताचे अनेक निर्णय बँक यापुढेही घेणार आहे.

अशी आहे वैयक्तिक अपघात विमा योजना

  • जिल्हा बँकेकडून भारती एक्सा जनरल इन्शुरन्सच्या सहयोगातून अपघाती विमा योजना.
  • सेवा संस्थाकडील कर्जदार व बिगर कर्जदार अश्या एकूण २ लाख ५२ हजार २१० शेतकऱ्यांना विमा सुरक्षाकवच.
  • अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई.
  • कायम अपंगत्व व अंशतः अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार त्या- त्या प्रमाणात भरपाई.
  • शेतकऱ्यांना तोशीस लागू न देता बँकेनेच उचलला विमा हप्त्याचा भार.
Team Lokshahi News

Share
Published by
Team Lokshahi News
Tags: Bharati Axa life Insurance farmer insurance by bharati axa KDCC Bank केडीसीसी बॅंक शेतकरी विमा बॅंक विमा भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स शेतकरी अपघात विमा