Categories: सामाजिक

कोल्हापूर : दोन भाऊ आणि चुलतीचा एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यु; घटनेची माहिती समजताच तिनेही सोडले प्राण!

कोल्हापूर | कळे येथील एकाच कुटुंबातील तिघा मायलेकांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याच्या घटनेचा धक्का बसून वडणगे (ता. करवीर) येथील नातेवाईक महिलेचा हृदयविकाराच्या धक्काने मृत्यु झाला. एकाच कुटूंबातील नातेवाईकांच्या अशा आकस्मिक मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

कळे येथील बांधकाम साहित्य व्यावसायिक असलेल्या देसाई कुटूंबातील तिघांचा एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यू झाला. दीपक पांडुरंग देसाई (वय ४२), सागर पांडुरंग देसाई (वय ३९) व त्यांची आई मालुबाई पांडुरंग देसाई (वय ७०) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, दीपक देसाई यांची वडणगे येथील बहिण सुवर्णा सदाशिव जौंदाळ (वय ५५) यांना सदर घटना समजली. याचा मानसिक धक्का बसल्याने रात्री पावणेनऊच्या सुमारास हृदय विकाराने त्यांचाही मृत्यू झाला. दीपक यांचे वडील पांडुरंग तुकाराम देसाई व तिसरा भाऊ जलराज यांच्यावर सध्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर देसाई यांच्या कुटूंबातील  सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आठजण निगेटिव्ह आले. यामुळे देखीस चिंता वाढली आहे. 

  • गत आठवड्यात त्यांची चुलती अनुसया यशवंत देसाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या उत्तरकार्याला  काही नातेवाईक आले होते. उत्तरकार्यानंतर त्यांच्यापैकी वडणगे येथील महिला पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर देसाई कुटुंबातील सदस्यांना त्रास जाणवू लागला. पांडुरंग तुकाराम देसाई, मालुबाई पांडुरंग देसाई हे पती-पत्नी व दीपक,सागर व जलराज (पन्हाळा पोलिस कर्मचारी) ही त्यांची तीन मुले सर्वांनी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात तपासणी केली. सर्वजण वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांनी स्वॅब दिला नाही. पांडुरंग तुकाराम देसाई, मालुबाई पांडुरंग देसाई हे पती-पत्नी व त्यांची मुले दीपक, सागर व जलराज यांना त्रास जाणवत असल्याने एचआरटीसीवर उपचार सुरू केले. उपचारादरम्यान, दीपकची प्रकृती बिघडली. सकाळी साडेआठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.त्याचा भाऊ सागर शेजारच्या बेडवर असल्याने त्याने आपला भाऊ दीपकचा मृत्यू झाल्याचे पाहिल्याने त्याचीही प्रकृती खालावत गेली व साडेअकराच्या सुमारास धक्क्याने त्याचाही मृत्यू झाला. तत्पूर्वीच उजलाईवाडी येथील दवाखान्यात उपचार सुरू असलेली त्यांची आई मालुबाई यांचाही साडेनऊ च्या सुमारास मृत्यू झाला.

याबाबत कळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विदयानंद शिरोलीकर यांच्याकडे चौकशी केली असता मयतांचे अहवाल प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. 

Team Lokshahi News