Categories: अर्थ/उद्योग कृषी राजकीय

सहकार विभागाच्या ‘त्या’ नोटीसीनंतर गोकुळ दुध संघाचा यु टर्न..!

कोल्हापूर | ‘शेतकरी हिताच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने मंगळवारी, २१ जुलै रोजी दूध संकलन व्यवस्थितरित्या चालू ठेवावे. अन्यथा संघावर सहकार कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा सहकार विभागाने दिला. प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत सहकारी संस्था (दुग्ध) पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक प्रविण परब यांनी याबाबत गोकुळचे चेअरमन व कार्यकारी संचालकांना नोटीस दिली होती. सहकार विभागाच्या या नोटिसीमुळे गोकुळने यु टर्न घेत दुध संकलन सुरऴीत राहणार असल्याचे कळवले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दुधाला वाढीव दर मिळावा यासाठी २१ जुलै रोजी एकदिवसीय राज्यव्यापी दूध संकलन बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला गोकुळ दूध संघानेही पाठिंबा द्यावा असे आवाहन स्वाभिमानी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले होते. त्यानुसार गोकुळ दूध संघानेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तसे परिपत्रक दिले होते. 

गोकुळच्या या निर्णयासंदर्भात संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी एका वेळेचे दूध संकलन बंद करणे म्हणजे सहा लाख लिटर दूध संकलन बंद ठेवणे, याची अंदाजित किंमत तीन कोटी रुपये असून इतके मोठे आर्थिक नुकसान करणे चुकीचे आहे. त्याऐवजी गोकुळने शेतकऱ्यांचे हित पाहावे. या भूमिकेतूनच आंदोलनाचा इशारा आणि सहकार संस्थेकडे तक्रार केल्याचे पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, पाटील यांच्या तक्रारीची दखल घेत विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी गोकुळला नोटीस दिली, आणि मंगळवारी दूध संकलन चालू ठेवण्याविषयी कळविले. त्यामुळे गोकुळने स्वाभिमानीच्या दुध दर आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घेत दुध संकलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Lokshahi News