Categories: Featured

‘आज के शिवाजी’ पुस्तकाबद्दल उदयनराजेंची ‘ट्विट’वरून प्रतिक्रिया!

मुंबई। ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांना भाजपचा राजीनामा देऊन भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं होतं. या आव्हानानंतर भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी लगेचच आपली प्रतिक्रिया दिली होती. तर माजी खासदार उदयनराजे भोसले हे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. याप्रकरणी आतापर्यंत उदयनराजे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया सोशल मिडीयावरून दिली आहे. यामध्ये त्यांनी आपण या पुस्तकाबाबत मंगळवारी (१४ जानेवारी) बोलू असे सांगितले आहे.

उदयनराजे म्हणतात, “‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर उद्या मंगळवार दि १४ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता रेसिडन्सी क्लब, पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सडेतोडपणे आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत”

त्यामुळे आता उदयनराजे कोणती सडेतोड भूमिका घेतात हे पाहणं शिवप्रेमींसाठी महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान उदयनराजे यांनी सडेतोड भूमिका घेण्याआधीच संतप्त शिवप्रेमींच्या रोषापुढे भाजपला नमते घ्यावे लागले असून पुस्तक मागे घेतल्याची घोषणा करावी लागलीय. तसे ट्विट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे.

Team Lokshahi News